IPL 2025 Avesh Khan Mother Crying Nicholas Pooran Consoles Video: आयपीएल २०२५ च्या ३६व्या सामन्यात राजस्थान आणि लखनौमध्ये थरारक सामना खेळवला गेला. या सामन्यात लखनौच्या आवेश खानने संघाला २ धावांनी रोमांचक विजय मिळवून दिला. या सामन्यानंतर एक भावुक दृश्य पाहायला मिळालं. आवेश खानची आई त्याच्या लेकाला भेटण्यासाठी रडताना दिसली. पण दरम्यान निकोलस पुरन आवेशच्या आईला हिंदीत समजवताना दिसला.

जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्स विजयाच्या उंबरठ्यावर होेते. पण उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आवेश खानने त्याच्या शेवटच्या २ षटकांमध्ये सामन्याचा रोख बदलला. १८व्या षटकात आवेशने यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांची विकेट घेतली. त्यानंतर २० व्या षटकात, जेव्हा राजस्थानला फक्त ९ धावांची आवश्यकता होती, तेव्हा लखनौच्या वेगवान गोलंदाजाने एक विकेट घेतली आणि फक्त ६ धावा देऊन संघाला संस्मरणीय विजय मिळवून दिला.

आवेश या सामन्याचा स्टार ठरला आणि त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. अर्थातच हे त्याच्यासाठी खूप खास होते, पण त्याहूनही महत्त्वाचा क्षण आला जेव्हा त्याला त्याच्या आईला भेटण्याची संधी मिळाली. आवेशचा सामना पाहण्यासाठी त्याचं संपूर्ण कुटुंबिय उपस्थित होतं.

विजयानंतर लखनौ सुपर जायंट्सने एक व्हिडिओ पोस्ट केला. ज्यामध्ये आवेश आणि त्याच्या आईमधील हा भावनिक क्षण कैद करण्यात आला. या व्हिडिओमध्ये, आवेश त्याच्या आईशी व्हिडिओ कॉलवर बोलताना दिसत आहे, जी त्याचा सामना पाहून भावुक झाली होती.

यादरम्यान आवेशबरोबर तिथे निकोलस पुरन उपस्थित होता. निकोलसने तितक्यात विचारलं, “तुम्ही का रडताय? नका रडू, हसा हसा…” आवेशही आईला तेच म्हणाला, “रडू नकोस, हस तू…” दरम्यान पुरन त्याच्या हिंदीमधून आवेशच्या आईची समजूत काढताना दिसला. पुरन म्हणाला, “रोना हस नही…” हे ऐकून आवेशही हसला. पुन्हा पुरन म्हणाला, “बेटा गुड, बेटा भालो” (तुमचा लेक चांगला खेळतोय)

काही वेळाने, आवेश स्टेडियमच्या दुसऱ्या भागात पोहोचला, जिथे त्याचे कुटुंबिय उपस्थित होते आणि आवेश समोर येताच त्याच्या आईने रडत त्याला मिठी मारली. हे पाहून तिथे उपस्थित असलेले इतर लोकही भावुक झाले. यादरम्यान केवळ त्याची आईच नाही तर आवेशचे वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यही त्यांच्या स्टारला भेटले.