आयपीएल २०२५ स्पर्धेत आज डबल हेडरचा सामना रंगणार आहे. डबल हेडरचा पहिला सामना राजस्थानच्या होम ग्राऊंडवर पार पडला. राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांअखेर ५ गडी बाद २१९ धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना पंजाबने १० धावांनी बाजी मारली.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर चांगलाच हल्लाबोल केला. पंजाबच्या युवा सलामीवीर फलंदाजांना या डावात हवी तशी सुरूवात करता आली नाही. प्रियांश आर्य ९ तर प्रभसिमरन सिंग २१ धावांवर माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मिचेल ओवेन शून्यावर माघारी परतला.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नेहाल वढेरा गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने ३७ चेंडूंचा सामना करत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने ७० धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने ३० धावा चोपल्या. शेवटी शशांक सिंगने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ५९ धावा केल्या. या खेळीच्या बळावर पंजाब किंग्जने २० षटकांअखेर ५ गडी बाद २१९ धावा केल्या.

राजस्थान रॉयल्सला हा सामना जिंकण्यासाठी २२० धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सकडून यशस्वी जैस्वालने ५० धावा केल्या. तर वैभव सूर्यवंशीने ४० धावा चोपल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजू सॅमसनने २० धावांची खेळी केली. शेवटी हातून निसटलेला सामना ध्रुव जुरेलने परत आणून दिला. त्याने ५३ धावा करत संघाला विजयाच्या अगदी जवळ पोहोचवलं होतं. मात्र, शेवटी राजस्थानचा संघ विजयापासून १० धावा दूर राहिला. शेवटच्या दोन षटकात राजस्थानचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. शेवटच्या १२ चेंडूत राजस्थानला ३० धावा करायच्या होत्या. मात्र,ध्रुव जुरेल बाद झाल्याने राजस्थानचा संघ लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरला.