PM Narendra Modi Praised Vaibhav Suryavanshi: आयपीएल २०२५ स्पर्धेत १४ वर्षांचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या तुफान चर्चेत आहे. वैभवने वयाच्या १४ व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि सर्वात युवा शतकवीर होण्याचा मान पटकावला. वैभवने गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीनंतर क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी त्याचं कौतुक केलं. आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील वैभवचं कौतुक केलं आहे.

बिहारमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स २०२५ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना त्यांनी वैभव सूर्यवंशीचं कौतुक केलं. त्यांनी वैभवच्या शतकी खेळीचं कौतुक केलं. यासह त्याच्या उत्साहाचा आणि मेहनतीचाही उल्लेख केला.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

वैभव सूर्यवंशीचं कौतुक करताना नरेंद्र मोदी म्हणाले, “ मी आयपीएलमध्ये बिहारचा सुपुत्र वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहिली. इतक्या कमी वयात त्याने इतका मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. या यशामागे त्याची प्रचंड मेहनत आहे. “

तसेच ते पुढे म्हणाले, “ वैभवने विविध स्तरांवर खेळून आपलं कौशल्य विकसित केलं आहे. जितके जास्त सामने खेळणार, तितकी कामगिरी आणखी चांगली होते. त्यामुळे सामन्यांमध्ये आणि स्पर्धांमध्ये सहभाग घेणं अतिशय महत्वाचं आहे.

वैभवची विक्रमी खेळी

वैभव सूर्यवंशी अवघ्या १४ वर्षांचा आहे. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या मेगा लिलावात राजस्थान रॉयल्सने त्याला १.१ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. इतक्या कमी वयात आयपीएल खेळण्याची संधी मिळणं, मोठी गोष्ट आहे. मात्र त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी मिळणार का? हा मोठा प्रश्न होता. अखेर राहुल द्रविडने त्याला प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची संधी दिली आणि सलामीला फलंदाजीला पाठवलं.

वैभवने आपल्या पहिल्याच सामन्यातील पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचला. त्यानंतर पुढील काही सामन्यांमध्ये तो फ्लॉप ठरला. मात्र गुजरात टायटन्सविरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने इतिहास रचला. वैभवने अवघ्या ३५ चेंडूत तुफान फटकेबाजी करत या हंगामातील सर्वात वेगवान शतक झळकावलं. यासह तो आयपीएलमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा फलंदाज देखील ठरला. हा रेकॉर्ड मोडून काढणं जरा कठीणच आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.