पुणे : लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलला रोखण्याचे प्रमुख आव्हान शुक्रवारी ‘आयपीएल’ क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जला पेलावे लागणार आहे.
‘आयपीएल’च्या गुणतालिकेत लखनऊचा संघ आठ सामन्यांमधून पाच विजय आणि तीन पराभवांसह चौथ्या स्थानावर आहे, तर पंजाबने आठ सामन्यांपैकी चार विजय आणि चार सामने गमावले आहेत. पंजाबने याआधीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला ११ धावांनी हरवले होते.
राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्ध दोन शतकांसह एक अर्धशतकही झळकावले असून, त्याच्या खात्यावर एकूण ३६८ धावा जमा आहेत. फलंदाजांच्या यादीत तो जोस बटलरनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
लखनऊकडे सलामीवीर क्विंटन डीकॉक, दीपक हुडा, आयुष बडोनी, कृणाल पंडय़ा, मार्कस स्टॉइनिस, जेसन होल्डपर्यंत फलंदाजीची फळी आहे. याचप्रमाणे गोलंदाजीत दुष्मंता चमीरा, होल्डर यांनी एकूण १४ बळी मिळवले आहेत. कृणाल, रवी बिश्नोई आणि या फिरकी गोलंदाजांची षटके निर्णायक ठरतात.
पंजाबच्या गोलंदाजीची धुरा वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडावर आहे. हाणामारीच्या षटकांत रबाडा आणि अर्शदीप सिंग टिच्चून मारा करतात. याशिवाय संदीप शर्मा, रिशी धवन व राहुल चहर यांच्यासारखे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. फलंदाजीची भिस्त सलामीवीर शिखर धवन, कर्णधार मयांक अगरवाल, भानुका राजपक्षेवर आहे.
• वेळ : सायं. ७.३० वा.
• थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदूी, सिलेक्ट १