जयपूर : पराभवाची हॅट्ट्रिक झाल्यानंतर विजयाच्या वाटेवर परतलेल्या राजस्थान रॉयल्सला शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्जच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आता बाद फेरीसाठीची चुरस रंगात आली असून, राजस्थानसाठी हा विजय अनिवार्य असेल.

तीन सलग पराभवांनंतर राजस्थानच्या बाद फेरीच्या आशा मावळण्याची शक्यता होती. मात्र मागील सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध १५ धावांनी विजय मिळवल्यामुळे त्यांनी आव्हान टिकवून ठेवले आहे. पुण्यात झालेल्या लढतीत चेन्नईने राजस्थानवर ६४ धावांनी शानदार विजय मिळवला होता. या पराभवाचा वचपा काढण्याची संधी राजस्थानला असणार आहे.

राजस्थानसाठी यंदाचा हंगाम फारसा समाधानकारक ठरला नाही. १० सामन्यांमधून ८ गुण मिळवणारा हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. आता उर्वरित चार सामन्यांच्या विजयांवर राजस्थानचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील राजस्थान फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर हा संघ झगडताना आढळला आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी १० सामन्यांतून १४ गुण मिळवले असून, उर्वरित चार सामन्यांमध्ये एक सामना जिंकला तरी त्यांचे बाद फेरीमधील स्थान निश्चित होऊ शकते. दोन वर्षांच्या बंदीनंतर परतलेला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ यंदाच्या हंगामात संभाव्य विजेता गणला जात आहे. दीपक चहर दुखापतग्रस्त आहे.

’  सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

’  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.