सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याने आयपीएलच्या १४ व्या हंगामात धडकेबाज कामगिरी केली होती. त्याने १४ व्या हंगामात ३२ विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली होती. त्याच्या या कामगिरीनंतर पटेलचे नशिबच पालटले. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात त्याला बंगळुरुने तब्बल १०.७५ कोटी रुपयात विकत घेतलेले आहे. क्रिकेटमध्ये सध्या तो नावाजलेला चेहरा असला तरी त्याने अगोदर खूप संघर्ष केलेला आहे. त्याच्या खडतर प्रवासाचा एक किस्सा त्याने नुकताच सांगितला आहे. आयपीएलमध्येच लिलावादरम्यान त्याला कसे फसवले गेले होते. त्याचा विश्वासघात कसा झाला, याबद्दल त्याने सविस्तर सांगितलं आहे. हेही वाचा >> RR vs RCB : रविचंद्रन अश्विनने बंगळुरूला दिले तीन धक्के; आयपीएलमध्ये रचला खास इतिहास यूट्यूबर गौरव कपूर आपल्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स या मुलाखतीच्या कार्यक्रमात क्रिकेटपटूंना बोलतं करतो. याच कार्यक्रमात हर्षल पटेल याने २०१८ सालच्या आयपीएलमध्ये लिलावादरम्यान त्याच्यासोबत काय घडलं होतं याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. त्यावेळी जवळपास तीन ते चार फ्रेंचायझींनी आम्ही तुझ्यासाठी बोली लावू असे हर्षल पटेलला सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र दिल्ली कॅपिट्लसव्यतिरिक्त एकाही संघाने त्याच्यासाठी बोली लावली नव्हती.याच प्रकारामुळे हर्षल पटेलला त्याची फसवणूक आणि विश्वासघात केल्यासारखे वाटले. ही माझी फसवणूक होती, असे हर्षल पटेलने या कार्यक्रमात बोलताना सांगितले. हेही वाचा >> “कोहलीने आता ब्रेक घ्यावा, तेच शहाणपणाचं ठरेल,” रवी शास्त्रींचा विराटला सल्ला आयपीएल २०१८ सालच्या हंगामात दिल्ली संघाने हर्षल पटेलला पाच सामन्यांत खेळण्याची संधी दिली होती. या सामन्यांमध्ये त्याने सात विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर २०१९-२० साली देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला दिल्ली कॅपिट्ल्सने रिटेन केले होते. मात्र २०२० च्या आयपीएल हंगामातही त्याला फक्त पाच सामन्यांमध्ये संधी दिली गेली. त्यानंतर २०२१ च्या आयपीएलमध्ये तो बंगळुरु संघाकडून खेळला. या हंगामात त्याने धडाकेबाज गोलंदाजी केली होती. तरीदेखील बंगळुरु संघाने त्याला रिटेन केले नव्हते. त्यानंतर २०२२ च्या लिलावात बंगळुरु संघाने त्याला तब्बल १०.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.