RCB Victory Parade Bengaluru Stampede Updates : १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएलचे विजेतेपद मिळवलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे स्वागत करण्यासाठी बुधवारी (४ जून) लाखोंच्या संख्येत त्यांचा चाहता वर्ग बंगळुरूच्या रस्त्यावर जमला होता. मात्र, या उत्सवाला गालबोट लागले. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी मैदानाबाहेर गर्दी आटोक्याच्या बाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, चेंगराचेंगरीत मृत झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना आरसीबीने आता १० लाखांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज अधिकृत सोशल मिडिया पोस्ट केली.
“काल बेंगळुरूमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने आरसीबी कुटुंबाला खूप वेदना आणि वेदना झाल्या आहेत, असं आरसीबीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. “आदर आणि एकतेचे प्रतीक म्हणून, आरसीबीने ११ मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. याशिवाय, या दुःखद घटनेत जखमी झालेल्या चाहत्यांना मदत करण्यासाठी आरसीबी केअर्स नावाचा एक निधी देखील तयार केला जात आहे. आमचे चाहते नेहमीच आमच्या प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी राहतील”, असंही आरसीबीने पुढे निवेदनात म्हटलं आहे.
गर्दीचं नियोजन करता न आल्याने येथे चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय. हा कार्यक्रम वैध पास असलेल्या लोकांसाठी होता, परंतु मोफत पास मिळत असल्याची अफवा पसरली आणि स्टेडिअमच्या गेटवर प्रचंड गर्दी झाली. या गर्दीत ११ जणांचा मृत्यू झाला. या स्टेडिअमची ३५ हजार लोकांचीच क्षमता होती. मात्र, येथे अडीच ते तीन लाखांहून अधिक लोक एकाचवेळी जमल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे या गर्दीचं नियोजन करताना प्रशासनाची दमछाक झाली.
विजयी परेड भोवतालचा गोंधळ
एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची घटना विजयी परेडविषयीच्या परस्परविरोधी विधानांमुळे घडली असे अनेकांचे सांगणे आहे. आरसीबी संघाच्या व्यवस्थापनाने सायंकाळी ५ वाजता विजयी परेड आयोजित करण्याची घोषणा केली. त्यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगण्यात आले, “चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयी परेडनंतर उत्सव साजरा केला जाईल. आम्ही सर्व चाहत्यांना पोलिस आणि इतर अधिकाऱ्यांनी ठरवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची विनंती करतो. shop.royalchallengers.com वर मोफत पास (मर्यादित प्रवेश) उपलब्ध आहेत,” असे त्यात सांगण्यात आले होते. परंतु, बंगळुरू पोलिसांनी यापूर्वीच सांगितले होते की, विजयी परेड होणार नाही. या परस्परविरोधी विधानांमुळे आरसीबी संघाबरोबर विजय साजरा करण्यासाठी स्टेडियमबाहेर लोकांची मोठी गर्दी जमली, असा अंदाज आहे.