RCB Winner Of IPL 2025: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास सर्व महत्त्वाच्या स्पर्धा जिंकणाऱ्या विराट कोहलीची आयपीएलचे जेतेपद मिळवण्याची १८ वर्षांची प्रतीक्षा अखेर मंगळवारी रात्री संपुष्टात आली. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. २००८ मध्ये आयपीएलला सुरुवात झाल्यापासून विराट कोहली बंगळुरूकडून खेळत आहे. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या बंगळुरूला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. मात्र, यंदा त्यांनी दमदार कामगिरी करत पहिल्या जेतेपदाला अखेर गवसणी घातली.

दरम्यान बंगळुरूच्या या विजयानंतर सोशल मीडियावर प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज व्यक्त होत आहेत. अनेकांनी यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि विराट कोहलीचे अभिनंदन केले आहे. अशात उद्योगपती आनंद महिंद्रा यांची एक्स पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, विराट कोहली आणि निष्ठेवर भाष्य केले आहे.

आपल्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा म्हणाले की, “१८ वर्षे, विराट कोहलीने आपले मन, आपली निष्ठा एका अशा संघाला दिली, जो संघ एकदाही ट्रॉफीला स्पर्श करू शकला नव्हता. तो त्या पहाटेच्या प्रकाशाची वाट पाहत राहिला. आणि अखेर, आकाशातल्या तार्‍यांनीही त्याच्या विश्वासाला उत्तर दिले. अशी निष्ठा केवळ विजेतेपद मिळवून देत नाही, ती इतिहास घडवते.”

यावेळी महिंद्रा यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या, “विश्वास म्हणजे असा पक्षी आहे जो प्रकाशाची चाहूल घेतो आणि पहाट अजून काळोखी असतानाही गातो”, या वाक्याचाही उल्लेख केला आहे.

२००८ मध्ये भारताला १९ वर्षांखालील एकदिवसीय विश्वचषक जिंकून दिल्यानंतर कोहलीला बंगळुरू संघात स्थान मिळाले होते. त्यानंतर कोहलीने २००९, २०११ आणि २०१६ मध्ये अशा तीन आयपीएल जिंकण्याच्या संधी गमावल्या आहेत. २०२१ मध्ये कर्णधारपद सोडल्यानंतरही, कोहली आरसीबीचा भावनिक आणि फलंदाजीचा आधारस्तंभ राहिला आहे. २०१६ च्या हंगामात त्याने केलेल्या ९७३ धावांची अजूनही कोणी बरोबरी करू शकलेले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान काल झालेल्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जने नानेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बंगळुरूने विराट कोहलीच्या ४३ धावा आणि इतर फलंदाजांनी केलेल्या छोट्या पण महत्त्वाच्या खेळीच्या जोरावर १९० धावा केल्या होत्या. बंगळुरूच्या या धावांचा पाठलाग करताना पंजाब संघ २० षटकांत १८४ धावाच करू शकला.