IPL 2025 Final Last Over Drama: आयपीएलच्या १८व्या पर्वाचं विजेतेपद रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं आपल्या नावावर केलं आणि ‘इ साला कप नामदू’चा सर्वत्र गजर झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये कधीच विजेतेपद न पटकावलेले दोन संघ अंतिम सामन्यात होते. त्यामुळे यावेळी नवा विजेता मिळणार हे नक्की होतं. अंतिम सामन्यात आरसीबीच्या विजयामुळे बंगळुरूमध्ये जल्लोष होत आहे. पण एकीकडे विराट कोहलीच्या डोळ्यांतील अश्रू स्क्रीनवर दिसत असताना तिकडे खेळपट्टीवर शशांक सिंह नावाचं वादळ घोंगावत होतं! अत्यंत नाट्यमय झालेल्या या शेवटच्या षटकातल्याच दोन चेंडूंमुळे सामना फिरला!
नेमकं काय घडलं शेवटच्या षटकात?
आरसीबीचा विजय आणि इमोशनल झालेला विराट यामुळे शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं, याकडे नेटिझन्ससह प्रत्यक्ष मैदानावरील कॅमेरामन्सचंही दुर्लक्षच झाल्याचं दिसून आलं. कारण तिकडे शशांक सिंह शेवटच्या षटकात पंजाबला विजयाच्या जवळ नेत असताना इकडे स्क्रीनवर मात्र भावनिक झालेला विराट दिसत होता. शेवटच्या षटकातल्या फक्त दोन चेंडूंमुळे पंजाब विजेतेपदाच्या अंतिम रेषेच्या अत्यंत जवळ जाऊनही ती रेषा पार करू शकलं नाही.
RCB कडून शेवटचं षटक टाकण्यासाठी भरवशाच्या जॉश हेझलवूडच्या हातात कर्णधार रजत पाटीदारनं चेंडू सोपवला. PBKS ला विजयासाठी शेवटच्या षटकात २९ धावा करायच्या होत्या. पण त्याआधीच आरसीबीच्या चाहत्यांनी जल्लोषाला सुरुवात केली होती. हेझलवूडनं टाकलेला पहिला चेंडू फुल टॉस होता. शशांक सिंहनं तो मिस केला आणि त्यावर कोणतीही धाव निघाली नाही.
हेझलवूडनं दुसरा चेंडू टाकला, जो शशांकनं लाँग ऑफच्या दिशेनं मारला. पण तो थेट फिल्डरच्या दिशेनं गेला. एकही धाव निघाली नाही. तेव्हाच विराट कोहलीनं चेहऱ्यावर दोन्ही हात ठेवत अश्रू पुसले आणि सामना आरसीबीच्या खिशात गेल्याचं स्पष्ट झालं. पण या पहिल्या दोन निर्धाव चेंडूंनंतर जे घडलं, त्यावरून हे दोन चेंडूच आरसीबीच्या विजयासाठी कारणीभूत ठरले असं स्पष्ट झालं! नेटिझन्सकडूनही यासंदर्भात सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
दोन निर्धाव चेंडू आणि पंजाब हरलं!
हेझलवूडच्या पहिल्या दोन निर्धाव चेंडूंमुळे सामना आरसीबीच्या खिशात गेला. पण त्यानंतरच्या चार चेंडूंमध्ये शशांक सिंगनं एकहाती २२ धावा फटकावल्या! हेझलवूडच्या तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि पाचव्या व सहाव्या चेंडूवर सलग दोन षटकार! त्यामुळे पंजाबनं हा सामना आणि आयपीएलची ट्रॉफी फक्त सहा धावांनी गमावली. जर पहिल्या दोन चेंडूंपैकी एका जरी चेंडूवर मोठा फटका लगावण्यात शशांक सिंह यशस्वी झाला असता, तर कदाचित आयपीएल फायनलचा निकाल काहीसा वेगळा लागला असता!