आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे आयपीएल २०२५ एका आठवड्याकरता स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. पण आता लीग स्टेजमधील एका सामन्याच्या ठिकाणामध्ये अचानक बदल करण्यात आला.
नवीन वेळापत्रकानुसार, २३ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला बेंगळुरूमध्ये घरच्या मैदानावर खेळायचा असलेला सामना आता दुसऱ्या ठिकाणी होणार आहे. आरसीबीचा सनरायझर्स हैदराबादविरूद्धचा सामना आता लखनौच्या एकाना स्टेडियमवर खेळवला जाईल. बंगळुरूमधील हवामान लक्षात घेऊन बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
खरंतर, येत्या २-३ दिवसांत दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे आरसीबी आणि हैदराबाद यांच्यातील सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता होती आणि म्हणूनच आयपीएल आयोजकांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
आयपीएलच्या या निर्णयानंतर, आरसीबीला त्यांचे उर्वरित दोन्ही सामने इतर संंघांच्या घरच्या मैदानावर खेळावे लागतील. २३ मे रोजी आरसीबीचा सामना हैदराबादशी होईल. २७ मे रोजी त्यांना लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध खेळायचे आहे. म्हणजे आता बेंगळुरूमध्ये पुढील सामना होणार नाही.
आरसीबीचा मागील सामना पावसामुळे रद्द झाला होता. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धचा सामना १७ मे रोजी बेंगळुरू येथे होणार होता आणि तो सामना नाणेफेकीशिवाय रद्द करण्यात आला. आता २३ मे रोजीही बेंगळुरूमध्ये पावसाची शक्यता आहे. यामुळेच या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले. या सामन्याचा आरसीबीला खूप फायदा होईल कारण जर त्यांनी हा सामना जिंकला तर ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचू शकतात.
या सामन्याव्यतिरिक्त, प्लेऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर पंजाबमधील मुल्लानपूर येथे खेळवले जातील. क्वालिफायर २ आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल, बीसीसीआयने आजच २० मे रोजी घोषणा केली आहे.