मुंबई : ‘आयपीएल’ संघाचे कर्णधारपद भूषवणे, त्यामुळे येणार्या अपेक्षा पूर्ण करणे याचे दडपण वेगळेच असते. त्याचाच ऋषभ पंतला सामना करावा लागत आहे. त्याला सर्वोत्तम कामगिरी करण्यात येत असलेले अपयश खेळाडू लिलावात मिळालेल्या मोठ्या किमतीशी नाही, तर कर्णधारपदाच्या दडपणाशी संबंधित आहे, असे मत लखनऊ सुपर जायंट्सचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी व्यक्त केले.
लखनऊ संघ आणि या संघाचा कर्णधार पंतसाठी यंदाचा ‘आयपीएल’ हंगाम विसरण्याजोगा ठरत आहे. सोमवारी वानखेडेवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ५ बाद २२८ धावा करूनही लखनऊला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे लखनऊ संघ गुणतालिकेत तळाला राहिला आहे. पंतची कामगिरीही अत्यंत निराशाजनक ठरत आहे.
गेल्या हंगामापूर्वीच्या खेळाडू लिलावात लखनऊने तब्बल २७ कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह पंतला आपल्या संघाचा भाग बनवले. लखनऊसाठी दोन हंगामांत मिळून खेळलेल्या २३ डावांत त्याला केवळ दोन अर्धशतके आणि एक शतक करता आले आहे. मात्र, लखनऊ संघाचे प्रशिक्षक लँगर यांनी पंतची पाठराखण केली आहे.
‘‘पंत लिलावाच्या इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू असला, तरी या मोठ्या किमतीचा त्याच्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचे मला वाटत नाही. माझ्या मते, कर्णधारपदाची जबाबदारी खूप मोठी असते. त्यामुळे तुम्हाला विविध आव्हानांचा, दडपणाचा सामना करावा लागतो. त्याचा काही वेळा कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. हेच बहुधा पंतच्या बाबतीत घडत आहे,’’ असे लँगर म्हणाले.
‘‘पंत खूप मेहनत घेत आहे. सातत्याने प्रयत्न करत आहे. या हंगामात त्याने आम्हाला एक सामना जिंकूनही दिला आहे. त्याला हसतमुखपणे, आक्रमक शैलीत खेळताना पाहायला आम्हाला खूप आवडते. तो लयीत परत येण्यापासून फार दूर नाही, ,’’ असे म्हणत लँगर यांनी कर्णधाराला पाठिंबा दर्शवला.
