मुंबई इंडियन्स वि सनरायजर्स हैदराबाद सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनंतर सूर्यकुमार यादवच्या दमदार शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने जबरदस्त विजय मिळवला. सूर्यकुमार यादवसोबतच तिलक वर्मानेही त्याला चांगली साथ दिली. या दोन्ही खेळाडूंच्या १४३ धावांच्या भागीदारीसह मुंबईने हैदराबादला ७ विकेट्सने नमवले. मुंबईच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात मोठी भूमिका बजावली. मुंबईच्या दोन गोलंदाजांनी या सामन्यात ३-३ विकेट्स मिळवल्या. मुंबईच्या गोलंदाजांसमोर धावांचा पाऊस पाडणारे हैदराबादचे फलंदाज फार काळ टिकले नाहीत. एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि संघ केवळ १७३ धावा करू शकला. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं. इतकंच नव्हे तर खुद्द रोहित शर्माने त्याची पाठ थोपटली.

टी-२० विश्वचषक संघात पंड्याची उपकर्णधार म्हणून निवड झाली. पण पंड्याचा आयपीएलमधील फॉर्म पाहता त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. अष्टपैलू खेळाडू म्हणून बॅट आणि बॉलने फ्लॉप ठरत होता. पण पंड्याने एकाच सामन्यात त्याची उत्कृष्ट गोलंदाजी दाखवून दिली.

रोहितने थोपटली हार्दिकची पाठ

सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात हार्दिकने ७.८० च्या इकोनॉमी रेटने ४ षटकांत ३१ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. हार्दिकच्या पहिल्या दोन षटकांत ४ चौकार लगावले. पण त्यानंतर हार्दिकने भेदक गोलंदाजी केली. हार्दिकने नितीश रेड्डीला शॉर्ट बॉल टाकत झेलबाद केले. त्यानंतर मार्को यान्सनला १७ धावांवर क्लीन बोल्ड केले तर शाहबाज अहमदला सूर्याकडून झेलबाद केले.

हार्दिकच्या या सामन्यातील दुसऱ्या विकेटनंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने पाठीवर शाबासकी देत त्याचे कौतुक केले. रोहित आणि हार्दिकचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे.