लखनऊ : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) अखेरच्या लढतीत मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्सचा सामना करेल, तेव्हा त्यांचा प्रयत्न गुणतालिकेत शीर्ष दोन स्थानांमध्ये आपली जागा निश्चित करण्याचा असेल. तर दुसरीकडे लखनऊचा संघ हंगामाचा शेवट विजयाने करण्यासाठी प्रयत्नशील असेल.
गुजरात टायटन्सच्या सलग पराभवांमुळे तिसऱ्या स्थानी असणाऱ्या बंगळूरुला शीर्ष दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याची चांगली संधी आहे. ‘आयपीएल’च्या गुणतालिकेत शीर्ष दोन स्थानी असणाऱ्या संघांना तिसऱ्या व चौथ्या स्थानावरील संघांपेक्षा अंतिम फेरी गाठण्याची अतिरिक्त संधी मिळते. बंगळूरुचे १७ गुण आहेत. त्यांना अग्रस्थान गाठायचे असल्यास हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. मुंबई इंडियन्स व पंजाब किंग्ज या सामन्यातून कोणताही एक संघ गुजरात टायटन्सच्या (१८ गुण) पुढे जाण्यास सज्ज आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे लीगला स्थगित करण्यात आले होते. त्यापूर्वी बंगळूरुचा संघ चांगल्या लयीत होता. त्यांनी सलग चार सामने जिंकले होते. मात्र, लीग स्थगित झाल्यानंतर बंगळूरुची लय प्रभावित झाली.
लीग पुन्हा सुरू झाल्यानंतर कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्यांचा सामना पावसामुळे झाला नाही. नंतर सनरायजर्स हैदराबादकडून त्यांना ४२ धावांनी पराभूत व्हावे लागले. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचे संघात पुनरागमन झाल्याने बंगळूरुचा आत्मविश्वास दुणावला असेल. हेझलवूडने संघासाठी १० सामन्यांत १८ गडी बाद केले आहे. स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो चौथ्या स्थानावर आहे. लखनऊच्या त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणे सोपे नाही. गेल्या सामन्यात त्यांनी गुजरातला पराभूत केले. एडीन मार्करम, मिचेल मार्श आणि निकोलस पूरन यांनी लखनऊसाठी प्रभावी कामगिरी केली आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात संघात स्थान मिळालेल्या विल ओरूरकेने चमक दाखवली. हंगामाच्या अखेरच्या सामन्यात ऋषभ पंतकडून धावांची अपेक्षा असेल.
● वेळ : सायं. ७.३० वा.
● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार अॅप.