IPL Points Table After DC vs RCB Match : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सलग दुसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. यावेळी या संघाची जबाबदारी रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. नेतृत्वाचा फारसा अनुभव नसतानाही रजत पाटीदारने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचवलं आहे. ज्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला घरच्या मैदानावर एकही सामना जिंकता आला नव्हता, त्याच संघाने आता गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी झेप घेतली आहे.
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात कुणाल पांड्या आणि विराट कोहलीने शानदार अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ६ गडी राखून विजय मिळवला.
बंगळुरूची अव्वल स्थानी झेप
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा रेकॉर्ड पाहिला, तर या संघाने गेल्या पाचही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, १० पैकी ७ सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला विजय मिळवता आला आहे. तर ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघाने आतापर्यंत १४ गुणांची कमाई केली आहे. तर नेट रनरेट +०.५२१ इतका आहे.
टॉप ५ मध्ये कोणते संघ?
टॉप ५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. तर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरातचा संघ १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. हार्दिक पांड्याचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. पराभूत झालेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ १२ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. ११ गुणांसह पंजाब किंग्जचा संघ पाचव्या स्थानी आहे. टॉप ४ मध्ये असणारे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात दिल्लीचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीला ८ गडी बाद १६२ धावा करता आल्या. दिल्लीकडून केएल राहुलने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हा सामना जिंकण्यासाठी १६३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून कृणाल पांड्याने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने ५१ धावा केल्या. यासह बंगळुरूने हा सामना ६ गडी राखून आपल्या नावावर केला.