RCB vs RR match head to head record updates : आयपीएल २०२४ मधील ७० सामन्यांच्या लीग स्टेजनंतर प्लेऑफचे चित्रही स्पष्ट झाले आहे. आता प्लेऑफ्सचे सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने येणार आहेत. आयपीएलमधील हा दुसरा सामना असणार आहे, जेव्हा या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाईल. नऊ वर्षांपूर्वी हे दोन संघ एलिमिनेटर सामन्यात आमनेसामने आले होते. त्यावेळी ही लढत एकतर्फी झाली होती.

एलिमिनेटर सामन्यात राजस्थान-बंगळुरु आमनेसामने –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ सलग ६ सामने जिंकून प्लेऑफ्समध्ये पोहोचला आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सला गेल्या ५ सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. अशा स्थितीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला एलिमिनेटर सामन्यात आपली विजयाची मालिका कायम राखायची आहे. २०१५ मध्ये, जेव्हा या दोन संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला गेला, तेव्हा हा सामना आरसीबीने एकतर्फी पद्धतीने जिंकला होता. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमावून १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानचा संघ १०९ धावा करून सर्वबाद झाला होता. अशा स्थितीत राजस्थान रॉयल्सवर यावेळीही दडपण असणार आहे.

साखळी फेरीत दोन्ही संघांची कामगिरी कशी होती?

राजस्थान रॉयल्स संघाने साखळी फेरीतील १४ पैकी ८ सामने जिंकले आणि ५ सामने गमावले. त्याचवेळी पावसामुळे एक सामना रद्द झाला. राजस्थानने या हंगामाची सुरुवात चांगली केली होती. त्याने पहिल्या ९ सामन्यांपैकी ८ जिंकले होते. मात्र गेल्या ५ सामन्यांमध्ये त्याची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. हे 5 सामने त्याने मे महिन्यातच खेळले आहेत. त्याचवेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मे महिन्यात एकाही पराभवाला सामोरे जावे लागलेले नाही. मे महिन्यात त्याने या मोसमातील ६ सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. मात्र, आरसीबीची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या ८ सामन्यांपैकी फक्त १ सामना त्यांनी जिंकला होता.

हेही वाचा – IPL 2024 च्या प्लेऑफ्सचे चारही संघ ठरले! ‘क्वालिफायर वन’ आणि ‘एलिमिनेटर’ कोणत्या संघात होणार? जाणून घ्या

राजस्थान आणि बंगळुरुचा हेड टू हेड रेकॉर्ड –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघ आतापर्यंत एकूण ३१ वेळा आमनेसामने आले आहेत. या ३१ सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १५ वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघाने १३ वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. अशा प्रकारे हेड टू हेड रेकॉर्डमध्ये आरसीबीचा वरचष्मा राहिला आहे.

हेही वाचा – KKR संघाला दुहेरी फायदा, SRH विरुद्धचा सामना न खेळताही फायनलमध्ये पोहोचू शकतो, कसं ते जाणून घ्या?

आयपीएल २०२४च्या प्लेऑफ्सचे वेळापत्रक:

क्वालिफायर-१: केकेआर विरुद्ध एसआरएच, २१ मे, अहमदाबाद
एलिमिनेटर: आरसीबी विरुद्ध आरआर, २२ मे, अहमदाबाद
क्वालिफायर -२: क्वालिफायर १ पराभूत वि एलिमिनेटर विजेता, २४ मे, चेन्नई
फायनल – क्वालिफायर १ विजेता विरुद्ध क्वालिफायर २ विजेता ,२६ मे, एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई,