चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या नव्या हंगामातील पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाची आज, शनिवारी दिल्ली कॅपिटल्स संघाशी गाठ पडणार आहे. चेन्नई संघाने आतापर्यंतच्या तीनही सामन्यांत निराशाजनक कामगिरी केली असून ऋतुराज गायकवाडला कर्णधार आणि फलंदाज म्हणून छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे आता कामगिरी उंचावण्यासाठी त्याच्यावर दडपण आहे.

पाच वेळच्या ‘आयपीएल’ विजेत्या चेन्नई संघाने यंदाच्या हंगामाची सुरुवात सलग तीन पराभवांसह केली आहे. त्यांना हे पराभव तीन विविध ठिकाणी स्वीकारावे लागले आहेत. आता घरच्या मैदानावर, आपल्या चाहत्यांसमोर खेळताना त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागांतील कामगिरीत सुधारणा करावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस दुखापतीमुळे या तीनही सामन्यांना मुकला. आजच्या लढतीत त्याचे पुनरागमन अपेक्षित असून यामुळे चेन्नईच्या मधल्या फळीला बळकटी मिळू शकेल. गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध अप्रतिम अर्धशतक करणार्‍या सर्फराज खानचा कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. 

चेन्नईसाठी ऋतुराज आणि संजू सॅमसन या अनुभवी सलामीवीरांची कामगिरी चिंतेचा विषय ठरते आहे. सॅमसनला तीनही सामन्यांत दुहेरी आकडा गाठता आलेला नाही. ऋतुराजने पंजाब किंग्जविरुद्ध २८ धावा केल्या, पण अन्य दोन सामन्यांत तो एकेरी धावेवरच बाद झाला.

गेल्या सामन्यात बंगळूरुविरुद्धच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारताना ऋतुराजने फलंदाजीत सुधारणा गरजेची असल्याचे मान्य केले होते. त्यामुळे ऋतुराज आणि सॅमसन यांच्या कामगिरीवर आता चाहत्यांचे विशेष लक्ष असेल.

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्स संघाने सलग दोन विजयांसह स्पर्धेची सुरुवात केली होती. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्धही ते विजयाच्या उंबरठ्यावर होते. मात्र, अखेरच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना त्या काढण्यात अपयश आल्याने दिल्लीला हंगामातील पहिला पराभव पत्करावा लागला. मात्र, ही निराशा मागे सारून दमदार पुनरागमनाचा त्यांचा प्रयत्न असेल. गुजरातविरुद्ध केएल राहुलला सूर गवसला. तसेच पथुम निसांकाने सातत्य राखले. अखेरच्या षटकांत डेव्हिड मिलरने फटकेबाजी केली. अन्य फलंदाजांनीही योगदान देणे दिल्लीसाठी महत्त्वाचे ठरेल. गोलंदाजीत लुंगी एन्गिडी, कर्णधार अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यावरच दिल्लीची भिस्त असेल.

धोनीच्या अनुपस्थितीत नेतृत्वाची कसोटी

* ऋतुराज गायकवाडला फलंदाजीत तीन सामन्यांत मिळून केवळ ४१ धावा करता आल्या आहेत. त्यातच कर्णधार म्हणूनही त्याला गोलंदाजांचा योग्य वापर करता आलेला नाही.

* चेन्नईला पाच वेळा ‘आयपीएल’ जिंकवून देणारा महेंद्रसिंह धोनी यंदाच्या हंगामातील पहिल्या तीनही सामन्यांना मुकला. त्याची तंदुरुस्ती आणि उपलब्धतेबाबत प्रश्न कायम आहेत. त्याच्या अनुपस्थितीत ऋतुराजच्या नेतृत्वाची कसोटी लागते आहे.

* गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्ध चेन्नईच्या गोलंदाजांनी २५० धावा खर्ची केल्या. यावेळी चेन्नईच्या गोलंदाजांसह कर्णधार ऋतुराजही दडपणाखाली दिसला.

* अखेरच्या षटकांत ‘राऊंड द विकेट’ गोलंदाजी करणे हीच एकमेव योजना त्यांच्याकडे होती. दिल्लीच्या संघातही आक्रमक फलंदाज आहेत. त्यांना रोखण्यासाठी ऋतुराज आणि चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाला नवी योजना आखावी लागणार आहे.

आजचे सामने

पंजाब वि. हैदराबाद 

* वेळ : दुपारी ३.३० वा.

चेन्नई वि. दिल्ली 

* वेळ : सायं. ७.३० वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओहॉटस्टार ॲप