मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चांगलाच अटीतटीची लढत झाली. मुंबईसाठी ही लढत करो या मरो अशीच होती. या सामन्याची जेवढी चर्चा झाली, त्यापेक्षा कितीतरी जास्त चर्चा सचिन तेंडुलकरची झाली. एकीकडे सामना सुरु असताना डग आऊटमध्ये उभे राहत सचिनने त्याच्या करिअरबद्दल सांगितले. तो कसा घडत गेला? त्याने स्वत:ला कसे सिद्ध केले? याबद्दल सचिनने सविस्तर सांगितले. विशेष म्हणजे मी २९ वर्षे अनुभव असलेला २० वर्षांचा तरुण आहे, असे म्हणत मास्टर ब्लास्टर सचिनने त्याची मेहनत आणि क्रिकेटबाबत असलेल्या समर्पणावर भाष्य केले आहे.

हेही वाचा >>> महेंद्रसिंह धोनी बल्ले बल्ले! शेवटच्या षटकात माहीकडून जोरदार फटकेबाजी, चेन्नईचा थरारक विजय

सचिन तेंडुलकरने डग आऊटमध्ये उभे राहून समालोचकांशी संवाद साधला. यावेळी त्याने त्याची जडणघडण कशी झाली याबद्दल सांगितले. “मी माझा अनुभव सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आलो आहे. वयाच्या बारा वर्षांपासून ते माझ्या शेवटच्या कसोटी सामन्यापर्यंतचा माझा अनुभव अनेकांच्या कामी यावा म्हणून मी तो सांगण्याचा प्रयत्न करतो,” असे सचिन म्हणाला.

हेही वाचा >>> IPL 2022 : गोलंदाजांचं चोख काम , पण आजी-माजी कर्णधारांनीच केल्या चुका, जाडेजा-धोनीमुळे चेन्नईला फटका

येत्या २४ एप्रिल रोजी सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. तो ५० वर्षाचा होईल. याबद्दल सचिनला विचारले असता त्याने मजेदार उत्तर दिले. “मी माझ्या धावा आणि माझे वय कधीच मोजत नाही. मला सांगायला आवडेल की मी २९ वर्षे अनुभव असलेला २० वर्षांचा मुलगा आहे,” असे म्हणत प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा असे अप्रत्यक्षपणे सांगितले.

हेही वाचा >>> अरेरे… मुंबई इंडियन्सला झालंय तरी काय? पहिल्याच षटकात सलामीचे दोन्ही फलंदाज शून्यावर बाद!

तसेच मुंबई इंडियन्सच्या या हंगामातील खेळाबद्दलही सचिनने भाष्य केले. “या हंगामात मुंबई इंडियन्सने जे अनुभवलेले आहे ते कोणीही अनुभवले नाही. टी-२० क्रिकेटमध्ये कधी तुम्ही दोन ते तीन धावांनी पराभूत होता. तर कधीकधी शेवटच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागतो. मुंबईच्या संघाने जेवढा शक्य असेल तेवढा सराव केलेला आहे. आमच्या याआधीच्या कामागिरीमुळे आमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत आणि जास्त अपेक्षा असणे हे एकाप्रकारे चांगले आहे. ही टीम तरुण आहे. ही नवी टीम आहे. हा संघ सेटल होण्यासाठी कदाचित जास्त वेळ घेईल. मात्र या काळातून जाण्यासाठी टीम म्हणून एकमेकांसोबत राहणे गरजेचे आहे,” असे सचिन तेंडुलकर म्हणाला.