आयपीएल २०२५ च्या स्थगितीनंतर ५९व्या सामन्यात पंजाब किंग्स संघाला धक्का बसला आहे. राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात पंजाब किंग्सचा कर्णधार बदलला. राजस्थानविरूद्ध पंजाबने पहिल्या डावात फलंदाजी करत २२० धावांचे आव्हान दिले. पण दुसऱ्या डावात श्रेयस अय्यर फिल्डिंगला उतरला नाही.
दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून हरप्रीत ब्रार मैदानावर आला. तर श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत एका अनकॅप्ड खेळाडूला पंजाब किंग्जचे नेतृत्व सोपवण्यात आले. श्रेयस अय्यरच्या जागी पंजाबचा फिनिशर शशांक सिंगला नेतृत्त्व करण्याची संधी मिळाली.
श्रेयस अय्यर दुसऱ्या डावात मैदानावर का आला नाही, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. पण सामन्यादरम्यान, समालोचकांनी सांगितलं की अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त नसण्याची शक्यता आहे, म्हणून खबरदारी म्हणून त्याने हा निर्णय घेतला.\
सामन्याच्या एक दिवस आधी सराव सत्रादरम्यान पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरला त्याच्या बोटाला दुखापत झाली. पण त्याने राजस्थानविरुद्ध खेळण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीही केली. त्याच्या बोटाच्या दुखापतीमुळे श्रेयस पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. तर पंजाबचा डाव संपल्यानंतर, श्रेयस अय्यरच्या जागी हरप्रीत ब्रारला इम्पॅक्ट सब म्हणून मैदानात उतरवण्यात आले. अनकॅप्ड खेळाडू शशांक सिंगकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
श्रेयस अय्यर नाणेफेकीसाठी मैदानात आला तेव्हा त्याच्या बोटाला पट्टी बांधलेली होती. यानंतर तो ५ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने २५ चेंडूत ३० धावांची खेळी केली. अय्यरने १२० च्या स्ट्राईक रेटने ५ चौकारांसह धावा केल्या. फलंदाजी करतानाही श्रेयस अय्यर अडचणीत दिसत होता.