Shubman Gill React To Comparison With Sachin Tendulkar: यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की आयपीएल, शुबमन गिलची बॅट सगळीकडे तळपली. गिलने या वर्षात आतापर्यंत ९ शतके झळकावली आहेत. आयपीएल २०२३मध्ये ३ तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ शतके झळकावली आहेत. आयपीएल २०२३मध्ये आतापर्यंत गिलने १६ सामन्यात ८५१ धावा केल्या आहेत. अगदी साहजिकपणे शुबमनच्या प्रत्येक कमाल शॉटनंतर त्याची तुलना विराट कोहली, सचिन तेंडुलकर ते अगदी आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी होत असते. सचिन तेंडुलकरसह तुलनेची आणखी एक खास बाजू म्हणजे अनेकदा शुबमन व सचिनची लेक सारा तेंडुलकर यांच्या रिलेशनच्या चर्चा सुद्धा रंगत असतात. पण आता सचिनसह होणाऱ्या तुलनेवर स्वतः शुबमनने स्पष्ट उत्तर दिले आहे.
सचिनसह होणाऱ्या तुलनेवर गिलने ANI ला सांगितले की, “हे बघा लोकांना असं वाटतंय हे पाहून खूप छान वाटतं पण मला खरंच तसं वाटत नाही कारण सचिन सर, विराट भाई आणि रोहित शर्मा यांनी ज्यापद्धतीने आमच्या पिढीला प्रेरणा दिली ते विचाराच्या पलीकडे आहे. कदाचित आपण १९८३ चा विश्वचषक जिंकलो नसतो तर सचिन तेंडुलकर नसताच आणि जर २०११ चा विश्वचषक आपण जिंकलो नसतो तर मला तितकी प्रेरणा मिळाली असती का? कदाचित नाही. त्यामुळे, या प्रकारचा वारसा अमर असतो. आपण त्यांचा वारसा निश्चितपणे एका साच्यात बसवू शकत नाही.”




शुबमन गिल आयपीएल रेकॉर्ड्स (Shubman Gill IPL 2023 Records)
गिलने याआधीच २०२३ मध्ये केवळ ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६२४ धावा केल्या आहेत, ज्यात त्याने दोन शतके आणि एक द्विशतके ठोकली होती. आयपीएलमध्ये सुद्धा ८५१ धावा आणि तीन शतकांसह, गिल ऑरेंज कॅप क्रमवारीत अगदी वरच्या स्थानावर आहे आणि त्याच्याकडे कोहलीच्या ९६३ धावांचा रेकॉर्ड तोडण्याची संधी आहे.
हे ही वाचा<< धोनी व पांड्याच्या फॅन्सला विराट कोहलीचा मोठा आधार; स्टेडियममध्ये भरपावसातील ‘तो’ Video पाहून व्हाल खुश
CSK vs GT IPL 2023
तीन डावांत दोनदा गिलच्या शतकांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स या दोन प्रमुख आयपीएल संघांना बाद केले. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अंतिम फेरीत सुद्धा गिलच्या कामगिरीकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे. आपल्या संघाला सलग दुसरे आयपीएल विजेतेपद मिळवून देण्याच्या आशेने ९०० धावांचा टप्पा पार करणे गिलला शक्य होईल का हे आजच्या सामन्यात समजेल. या सामन्याचे क्षणोक्षणीचे अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या होम पेजवर आवश्य भेट द्या.