सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने आपल्या वेगानं भल्याभल्या फलंदाजांना थक्क केलं आहे. जेव्हा जेव्हा हैदराबाद संघ सामना खेळतो आणि समोर कोणताही संघ असतो तेव्हा उमरान मलिक सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू टाकतो. आयपीएलच्या या सीझन मधून फास्टेस्ट डिलिव्हरी ऑफ द मॅच अवॉर्ड देखील त्याला दिला जात आहे, जो उमरान मलिकने आतापर्यंत प्रत्येक सामन्यात जिंकला आहे. एवढेच नाही तर आता त्याने आयपीएल २०२२ मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रमही केला आहे.

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यात उमरान मलिकने आयपीएलच्या १५ व्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. त्याचा वेग १५४ किमी प्रतितास होता. मात्र, ऋतुराज गायकवाडने हा चेंडू खेळला. या चेंडूवर ऋतुराज गायकवाडने जोरदार चौकार लगावला आणि यासह त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. १०व्या षटकातील हा तिसरा चेंडू होता, जो शॉर्ट चेंडू होता. यावर ऋतुराज गायकवाडने पुल शॉट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या वरच्या काठाला लागून चौकार गेला. नंतर असे दिसून आले की हा चेंडू ताशी १५४ किलोमीटर वेगाने फेकला गेला होता.

आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम गुजरात टायटन्सच्या लॉकी फर्ग्युसनच्या नावावर होता, ज्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध १५३.९ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. पण आता उमरान मलिकने फर्ग्युसनला मागे टाकले आहे. उमरान मलिकने या मोसमात अनेकवेळा १५० किमी प्रतितास वेग गाठला आहे. इतकंच नाही तर उमरान मलिकसाठी हा हंगाम आतापर्यंत चांगला राहिला आहे. त्याने १५ बळी घेतले आहेत आणि सध्या आयपीएल २०२२ च्या पर्पल कॅपच्या शर्यतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, आयपीएल २०२२ च्या ४६ व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा १३ धावांनी पराभव केला. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. सामन्यानंतर ऋतुराज गायकवाडला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत दोन बाद २०२ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादला २० षटकांत सहा बाद १८९ धावाच करता आल्या. सनरायझर्स हैदराबादकडून निकोलस पूरनने ३३ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावा केल्या. यामध्ये त्याच्या शेवटच्या षटकात तीन षटकार लगावले.