सनरायजर्स हैदराबादने दिल्ली डेअर डेव्हिल्सवर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचे श्रेय जाते शिखर धवन आणि कर्णधार विल्यमसनला. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी केली. आयपीएल २०१८ मधील ही सर्वोच्च भागीदारी असून यात शिखर धवनचे ९१ धावांचे तर केन विल्यमन्सनचे ८३ धावांचे योगदान होते.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) गुरुवारी गुणतालिकेत तळाशी असलेल्या दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाची झुंज अव्वल स्थानावर असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघाशी झाली. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात हैदराबादची गोलंदाजी प्रभावी ठरली. पण गुरुवारी दिल्लीच्या ऋषभ पंतने हैदराबादच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक ठोकले आणि संघाला १८७ धावांचा पल्ला गाठून दिला. गोलंदाज निष्प्रभ ठरल्याने हैदराबादच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. यात भर म्हणजे हैदराबादची सलामीची जोडी अवघ्या १५ धावांवर फोडण्यात दिल्लीच्या गोलंदाजांना यश आले. अॅलेक्स हेल्स अवघ्या १४ धावांवर माघारी परतला.

यानंतर संघाची मदार होती शिखर धवन आणि कर्णधार केन विल्यमसनवर. या दोघांनी मोक्याच्या क्षणी त्यांच्या अनुभवाची झलक दाखवली. या दोघांनी दिल्ली गोलंदाजांची अक्षरश: धुलाई केली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्लीचे गोलंदाज या दोघांसमोर सपशेल अपयशी ठरले. शिखर धवनने ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांची बरसात करत नाबाद ९२ धावांची खेळी केली. तर केन विल्यमसनने ५३ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकार मारत नाबाद ८३ धावांची खेळी केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी १७६ धावांची भागीदारी केली. आयपीएल २०१८ मधील ही सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव आणि इशान किशन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची खेळी केली होती. राजस्थान रॉयल्सविरोधात त्यांनी ही खेळी केली होती. सर्वोच्च भागीदारीच्या तालिकेत शिखर धवन आणि विल्यमसन हे पुन्हा तिसऱ्या स्थानावरही आहेत. या दोघांनी ९ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरोद्ध दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली होती.