साखळी गटात आघाडीचे स्थान घेणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला हरवले तरच चेन्नई सुपर किंग्ज संघाचे इंडियन प्रीमिअर लीगच्या प्लेऑफमधील स्थान निश्चित होणार आहे. त्या दृष्टीनेच येथे रविवारी होणाऱ्या लढतीबाबत उत्कंठा निर्माण झाली आहे.

हैदराबादने आतापर्यंत झालेल्या अकरा सामन्यांमध्ये अठरा गुणांसह अव्वल स्थान घेतले आहे. चेन्नईने तेवढय़ाच सामन्यांमध्ये चौदा गुण मिळवले आहेत. शुक्रवारी राजस्थान रॉयल्स संघाने चेन्नईला पराभवाचा धक्का दिल्यामुळे त्यांना प्लेऑफसाठी आज सर्वोच्च कौशल्य दाखवावे लागणार आहे. राजस्थानविरुद्ध झालेल्या पराभवाचे खापर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने गोलंदाजांवर फोडले होते. त्यांचा अनुभवी गोलंदाज हरभजनसिंगने केवळ दोन षटकांमध्ये २९ धावा दिल्या होत्या. त्यामुळे उर्वरित दोन षटके टाकण्यासाठी त्याला संधी देण्याचे धाडस धोनी दाखवू शकला नाही.

चेन्नईच्या फलंदाजीची मुख्य मदार शेन वॉटसन, अंबाती रायुडू, सुरेश रैना, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डय़ु प्लेसिस, ध्रुव शौरी तसेच धोनी यांच्यावर आहे. राजस्थानविरुद्ध त्यांना अपेक्षेइतका दोनशे धावांचा टप्पा गाठता आला नव्हता. हैदराबादविरुद्ध त्यांना दोनशे धावांचे लक्ष्य ठेवावे लागणार आहे. चेन्नईच्या गोलंदाजीची भिस्त हरभजनसिंग, ब्राव्हो, रवींद्र जडेजा, वॉटसन, इम्रान ताहीर, शार्दूल ठाकूर, डेव्हिड विली, कर्ण शर्मा, सॅम बिलिंग्ज यांच्यावर आहे.

हैदराबादला शिखर धवन, कर्णधार केन विल्यम्सन, युसूफ पठाण, मनीष पांडे, शकीब अल हसन, वृद्धिमान साह, सचिन बेबी, कालरेस ब्रेथवेट यांच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे. भारताचा द्रुतगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार हे हैदराबादच्या गोलंदाजीचे मुख्य अस्त्र असणार आहे. त्याच्याबरोबरच सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, रशीद खान, शकीब अल हसन यांच्याकडून प्रभावी कामगिरीची आशा आहे.

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार असून खेळपट्टी फलंदाजीस पोषक राहील अशी अपेक्षा आहे. साप्ताहिक सुटीमुळे या सामन्यास प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळेल असा अंदाज आहे.

  • वेळ : दु. ४ वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स