Suryakumar Yadav Share Video Giving Trophy to Wife: सूर्यकुमार यादव यंदाच्या आयपीएलमध्ये शानदार फॉर्मात आहे. सूर्याने गेल्या १३ डावांमध्ये सातत्याने २५ अधिक धावा करत मुंबई इंडियन्सच्या संघासाठी मोलाचं योगदान दिलं आहे. दरम्यान प्लेऑफसाठीच्या महत्त्वाच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने संघाचा डाव सावरत ७२ धावांची नाबाद खेळी केली. सूर्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर त्याने पत्नी देविशाला ट्रॉफी दिली, ज्याचा व्हीडिओ त्याने शेअर केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध सामन्यात गोलंदाजांचे वर्चस्व होते. त्यामुळे या मैदानावर धावा काढणं सोपं नव्हतं. फलंदाजीसाठी अवघड असलेल्या या खेळपट्टीवर सूर्यकुमार यादवने सावध फलंदाजी करत शेवटपर्यंत टिकून राहिला. सूर्यकुमार यादवने तिलक वर्माच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचली आणि संघाचा डाव सावरला. यानंतर तिलक वर्मा झेलबाद झाल्यानंतर अखेरच्या दोन षटकांमध्ये सूर्याने नमन धीरच्या साथीने संघाला १८० धावांपर्यंत नेले.
ज्या खेळपट्टीवर १६० धावा होणं शक्य होतं. तिथे सूर्यकुमार यादवने नमन धीरच्या साथीने १८० धावांचा टप्पा गाठला. सूर्यकुमार यादवला सामन्यापूर्वी त्याच्या पत्नीने सांगितलं होतं की, तू गेल्या सामन्यांमध्ये सर्व पुरस्कार जिंकले आहेस, पण सामनावीराचा पुरस्कार जिंकला नाहीस. यानंतर सूर्याने त्याच सामन्यात उत्कृष्ट खेळी करत सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
सूर्याने सामन्यानंतर हा पुरस्कार नेऊन पत्नी देविशाच्या हातात दिला. ज्याचा व्हीडिओ सूर्याने शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये सूर्या म्हणाला, बायको बोलली सर्व ट्रॉफी घेऊन येतो, पण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणत नाही. हे घ्या आता असं म्हणत सूर्याने देविशाच्या हातात ट्रॉफी दिली. देविशाला कसं वाटतंय विचारताच ती प्लीज म्हणत बाजूला जाते. शेवटी दोघं एकत्र फोटो काढतात.
मुंबईच्या विजयानंतर सामनावीराचा पुरस्कार घेतल्यानंतर सूर्या म्हणाला, आतापर्यंत १३ सामने खेळले गेले आहेत. माझ्या पत्नीने आज मला एक सुंदर गोष्ट सांगितली. ती म्हणाली की, सर्व पुरस्कार मिळाले आहेत, पण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार तुला मिळालेला नाही. त्यामुळे आजचा हा पुरस्कार खास आहे. संघाच्या दृष्टिकोनातून ही खेळी महत्त्वाची होती आणि ही ट्रॉफी देखील तिच्यासाठी आहे. ती अशा क्षणांची वाट पाहत असते आणि आम्ही ते क्षण साजरे करतो.”
सूर्यकुमार यादवने यंदाच्या मोसमात मोठी शतकी खेळी केली नसली तरी त्याने छोट्या छोट्या पण मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. यासह सातत्यपूर्ण कामगिरीमुळे सूर्यकुमार यादव ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ५८३ धावांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर पहिल्या स्थानी साई सुदर्शन आणि दुसऱ्या स्थानी शुबमन गिल आहेत.