पीटीआय, नवी मुंबई
सलग तीन सामने जिंकलेल्या राजस्थान रॉयल्सपुढे शनिवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सचे आव्हान असेल. या सामन्यात राजस्थानचा विजयरथ रोखून हंगामातील पहिला विजय प्राप्त करण्याचा मुंबईचा प्रयत्न असेल.
डॉ. डी. वाय. स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात राजस्थानकडून माजी कर्णधार आणि ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू शेन वॉर्नला आदरांजली वाहण्यात येणार आहे. वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने २००८मध्ये ‘आयपीएल’च्या पहिल्या हंगामाचे जेतेपद मिळवले होते. शनिवारी (३० एप्रिल) या कामगिरीला १४ वर्षे पूर्ण होणार आहेत. राजस्थानने यंदाच्या हंगामात आठपैकी सहा सामने जिंकले असून, मुंबईला अजूनही विजयाचे खाते उघडता आलेले नाही. त्यामुळे मुंबईच्या बाद फेरीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
वेगवान गोलंदाजांच्या अपयशी कामगिरीमुळे मुंबईने उर्वरित हंगामासाठी धवल कुलकर्णीला संघात समाविष्ट केले आहे. ३३ वर्षीय धवल यंदा समालोचकाची भूमिका बजावत होता. ‘आयपीएल’मध्ये त्याने ८६ बळी मिळवले आहेत.
अनुभवी त्रिकुटाची चिंता
यंदा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा आणि अनुभवी सूर्यकुमार यादव यांचा अपवाद वगळता मुंबईच्या खेळाडूंना छाप पाडता आलेली नाही. मुंबईला विशेषत: कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि पोलार्ड यांच्याविषयी चिंता आहे. पोलार्डला अखेरच्या षटकांत अपेक्षित फटकेबाजी करता आलेली नाही. त्यामुळे राजस्थानविरुद्धच्या सामन्यात मोठे फटके मारण्याची क्षमता असलेल्या टीम डेव्हिडचे संघात पुनरागमन होऊ शकेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराला इतरांची साथ मिळणे गरजेचे आहे.
बटलर, चहलकडून अपेक्षा
राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरने यंदाच्या हंगामात सर्वाधिक ४९९ धावा केल्या आहेत. तसेच मुंबईविरुद्ध गेल्या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती. त्यामुळे पुन्हा त्याच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. त्याला देवदत्त पडिक्कल, कर्णधार संजू सॅमसन आणि शिम्रॉन हेटमायर यांची चांगली साथ लाभते आहे. गेल्या सामन्यात रियान परागने नाबाद ५६ धावांची खेळी केल्याने त्यालाही सूर गवसला आहे. गोलंदाजीची धुरा यजुर्वेद्र चहल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट आणि प्रसिध कृष्णा सांभाळतील.

’ वेळ : सायं. ७.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदूी, सिलेक्ट १ ( एचडी वाहिन्यांसह)