IPL 2025 Virat Kohli Record RCB vs DC: आरसीबीचा फलंदाज आणि रनमशीन असलेल्या विराट कोहलीने आयपीएलमध्ये अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. आयपीएलमध्ये कोणत्याच खेळाडूने आजवर अशी कामगिरी केलेली पण विराट कोहलीने करून दाखवलं आहे. विराट आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून या लीगमध्ये खेळत आहे. पहिल्या हंगामापासून विराटच्या बॅटने सातत्याने धावा पाहायला मिळत आहेत आणि १८ व्या हंगामातही हा ट्रेंड सुरूच आहे. आयपीएलमध्ये अनेको विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या विराट कोहलीने आपल्या खात्यात आणखी एक विक्रमाची नोंद केली आहे.

एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने हा विक्रम केला. घरच्या मैदानावर हंगामातील त्यांचा दुसरा सामना खेळणाऱ्या बंगळुरू संघाने प्रथम फलंदाजी केली आणि पुन्हा एकदा फिल सॉल्टने विराट कोहलीसह संघाला वादळी सुरुवात करून दिली. एकीकडे, सॉल्टने मिचेल स्टार्कवर चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला, तर विराटने दुसऱ्याच षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर चौकार मारला.

डावाच्या चौथ्या षटकात विराटने तो फटका खेळला, ज्याने कोहलीच्या नावावर आणखी एक आयपीएल विक्रम जोडला. अक्षर पटेलच्या चौथ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर, कोहलीने कव्हर्सवरून एक शानदार फटका मारला आणि चेंडू थेट सीमा ओलांडून षटकारासाठी गेला. यासह कोहलीने आयपीएलमध्ये त्याचे १००० बाऊंड्री पूर्ण केल्या. कोहलीने आयपीएलच्या २४९ डावांमध्ये हे १००० चौकार-षटकार पूर्ण केले. एकूणच, कोहलीने आतापर्यंत १००१ चौकार-षटकार मारले आहेत, ज्यात २८० षटकार आणि ७२१ चौकारांचा समावेश आहे.

विराट कोहलीने १००० चौकार-षटकारांचा टप्पा ओलांडला. आयपीएल इतिहासात ही कामगिरी करणारा विराट कोहली पहिला फलंदाज आहे. विराट कोहलीनंतर शिखर धवन या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ज्याने आयपीएलमध्ये ७६८ चौकार आणि १५२ षटकार मारले आहेत. म्हणजेच त्याच्या चौकार आणि षटकारांची संख्या ९२० आहे. तिसऱ्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने ६६३ चौकार आणि २३६ षटकार मारले आहेत. रोहित शर्मा चौथ्या स्थानी असून त्याने चौकार आणि षटकारांसह एकूण ८८५ चौकार मारले आहेत.