Virat Kohli Made History on Chinnaswamy Stadium: आयपीएल २०२४ अटीतटीचा सामना बेंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळवला जात आहे. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून आरसीबीविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, यासोबतच आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आयपीएलमध्ये आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा विक्रम आपल्या नावे करणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे.

आयपीएलमध्ये एकाच ठिकाणी ३००० धावा करणारा तो खेळाडू ठरला आहे. RCBचा माजी कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात एकाच ठिकाणी ३०००धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर त्याने ३००० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली आहे. आयपीएलमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवरील विराट कोहलीचा विक्रम पाहिल्यास, पहिल्या सत्रापासून आतापर्यंत, आरसीबीसाठी खेळताना, त्याने या मैदानावर ८६ डावांमध्ये २२ अर्धशतके आणि ४ शतके झळकावली आहेत.

या यादीत मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर त्याने २२९५ धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्स आहे, ज्याने बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर १९६० धावा केल्या आहेत. याशिवाय विराटने अजून एक कामगिरी आपल्या नावे केली आहे.

आयपीएलमध्ये ७०० चौकार मारणारा विराट कोहली आता शिखर धवननंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे. शिखर धवनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आतापर्यंत एकूण ७६८ चौकार मारले आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर डेव्हिड वॉर्नर आहे. ज्याने आयपीएलमध्ये ६६३ चौकार मारले आहेत. कोहली आयपीएलमध्ये एकाच मैदानावर ४०० चौकार मारणारा पहिला खेळाडू बनला आहे, त्याच्यानंतर रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे ज्याने वानखेडे स्टेडियममध्ये २१५ चौकार मारले आहेत.

आरसीबी आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात विराट कोहलीच्या बॅटमधून ९८ मीटर लांब षटकार पाहायला मिळाला, ज्यामध्ये त्याने तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर हा फटका मारला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २१८ धावा केल्या आहेत. आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी, RCB संघाला या सामन्यात CSK ला किमान १८ धावांच्या फरकाने पराभूत करावे लागेल, त्यानंतर त्यांचा नेट रन रेट चेन्नईपेक्षा चांगला असेल.