कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली बाद झाल्यानंतर मोठा गदारोळ पाहायला मिळाला. विराट ज्या पध्दतीने बाद झाला ते पाहता तो खूप संतापलेला दिसत होता, त्यामुळे त्याने अंपायरशी हुज्जत घातली होती. विराट कोहलीला हर्षित राणाने झेलबाद केले. याबाबत विराटने तो चेंडू नो बॉल असल्याचे मानले. यासाठी कोहलीने रिव्ह्यूही घेतला. मात्र, तिसऱ्या पंचांनी त्याला बाद घोषित केले. याच कारणामुळे विराट कोहलीने अंपायरशी वाद घालण्यास सुरुवात केली.

विराट कोहली आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.८ अंतर्गत लेव्हल १ साठी दोषी आढळला आहे. विराट कोहलीनेही आपला गुन्हा कबूल केला. विराटला मॅच फी च्या ५० टक्के दंड आकारण्यात आला आहे. “रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज विराट कोहली, याने इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ च्या ३६व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध ईडन गार्डन्स येथे IPL आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे, असे आयपीएलने निवेदनात म्हटले आहे.

विराट कोहली बाद झाल्यावर का भडकला?

आरसबीकडून फलंदाजी करणाऱ्या विराट कोहली वेगवान गोलंदाज हर्षित राणाविरुद्ध पूर्ण टॉस बॉलवर बाद झाला. हर्षित राणाचा तो चेंडू खूप उंच असल्याचे दिसत होते. व्हिडीओ रिप्लेमध्ये बॉल त्याच्या कमरेच्या वर असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे विराट कोहलीच्या मते तो चेंडू नो बॉल घोषित करावा, परंतु तिसऱ्या पंचाच्या निर्णयात विराट आऊट असल्याचे देण्यात आले.

विराट कोहली हर्षित राणाचा तो चेंडू त्याच्या क्रीजच्या पुढे येऊन खेळत होता. याशिवाय तो चेंडू खेळत असताना विराट पायाच्या बोटांवर उभा होता. अशा स्थितीत चेंडू त्याच्या कमरेच्या वर नक्कीच जात होता, पण त्याचा कोन खालच्या दिशेने जाणारा होता. क्रिकेटच्या नियमांनुसार, जर एखादा फलंदाज त्याच्या क्रिझच्या बाहेर फलंदाजी करत असेल, तर अशा स्थितीत कमरेच्या वर जाणाऱ्या चेंडूला नो बॉल दिला जात नाही. यामुळेच विराट कोहलीला बाद करण्यात आले.