Virat Kohli Disappointed Look Video: आयपीएल २०२४ च्या पॉईंट टेबलमध्ये वरच्या गटातील सन रायजर्स हैदराबाद व खालच्या गटातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने विजय आपल्या नावे केला. या बहुप्रतीक्षित विजयाच्या आधी सलग सात सामन्यांमध्ये पराभवाने आरसीबीची अवस्था बिकट झाली होती. त्यातही कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात तर हातातोंडाशी आलेला घास त्यांच्याकडून हिरावून घेतला होता. केकेआर विरुद्ध आरसीबी सामन्यात विराट कोहलीला बाद देण्यावरून झालेला वाद आपणही पाहिला असेलच. अवघ्या ६ चेंडूंमध्ये १८ धावा करत विराट आपलं वर्चस्व गाजवत असताना अचानक हर्षित राणाच्या फुल टॉसवर त्याला बाद देण्यात आलं होतं, यावरून कोहली व पंचांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती. ‘त्या’ बाद देण्याच्या निर्णयावरून कोहली अजूनही नाराज असल्याचं अलीकडेच व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय.

झालं असं की, कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या २२३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात जबरदस्त झाली होती. अवघ्या ६ चेंडूत २ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने कोहलीने १८ धावा केल्या होत्या. तिसऱ्या षटकांत चेंडू हर्षित राणाने षटकातील पहिलाच चेंडू कोहलीला फुल टॉस टाकला. विराटने स्ट्रेट ड्राइव्ह मारताच चेंडू उंच उडाला आणि हर्षित राणाने त्याचा झेल घेतला. यावर अंपायरने त्याला आऊट घोषित केले पण विराटने नो बॉल असण्याची शक्यता तपासण्यासाठी रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने दाखवलेल्या रिव्ह्यूमध्ये चेंडू कंबरेच्या वर असल्याचे दिसले, तरीही निर्णय विराटच्या विरोधात देण्यात आला. यानंतर कोहली संतापलेला दिसला, ज्यामुळे अंपायर आणि कोहली यांच्यात वाद झाला होता.

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कोहली एअरपोर्टवरून बाहेर पडताना दिसतोय, नेहमीप्रमाणे इथे कोहलीचे फोटो व्हिडीओ घेण्यासाठी पापराझींची गर्दी दिसतेय. स्नेहकुमार झाला यांनी हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला असून यात एक जण कोहलीला “आप आउट नही थे”, म्हणजेच “तुम्ही आउट नव्हतात” असं म्हणतो, ज्यावर कोहली नाराजीने फक्त मान डोलावतो. त्याच्या एका सेकंदाच्या कृतीमध्ये सुद्धा खूप दुःख असल्याचं दिसतंय अशा कमेंट्स लोकांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

हे ही वाचा<< कोहली- फाफची आरसीबी ७ सामने गमावून, नेट रन रेटशिवायही गाठणार प्ले ऑफ? IPL पॉईंट टेबलचं समीकरण पाहा

दरम्यान, या केकेआर विरुद्ध सामन्यात पंचांशी वाद घातल्यामुळे कोहलीला दंड सुद्धा ठोठावण्यात आला होता. या सामन्यात केकेआरने अवघ्या एका धावेच्या फरकाने आरसीबीवर रोमहर्षक विजय मिळवला होता.