रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीने खुलासा केला आहे की, भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेदरम्यान तो बंगळुरूच्या गजबजलेल्या भागात एका बेकरीमध्ये गेला होता जिथे त्याला कोणीही ओळखले नाही आणि ते पाहून तो सुखावला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये कोहलीने याचा उल्लेख केला आहे.

“कसोटी सामना संपला तो तिसरा दिवस होता. पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मासाठी काहीतरी घेऊन जायचे होते. अनुष्का बंगळुरूमध्ये मोठी झाली आहे आणि तिथे तिचे खूप मित्र आणि खूप आठवणी आहेत. अनुष्काला थॉम्स बेकरी आवडते. अनुष्काला तिथले पफ्स खूप आवडतात. बंगळुरुमध्ये ही तिची खाण्याची सर्वात आवडती गोष्ट आहे, असे विराट कोहली म्हणाला.

“मी थॉम्स बेकरीमध्ये गेलो आणि सुरक्षा रक्षकांना कारमध्ये बसण्यास सांगितले. माझ्याकडे एक मास्क आणि टोपी होती आणि सामान्य स्थितीचा अनुभव घेण्याचा हा सर्वोत्तम मार्ग होता आणि मी खरेच सांगतो की मला कोणीही पाहिले नाही, ही खरोखरच खूप छान भावना होती. मी त्या व्यक्तीला माझे क्रेडिट कार्ड दिले आणि मला वाटले की माझी ओळख पटेल. काही झालं असतं तर मी माझ्या फोनवरून सिक्युरिटी नंबर डायल करायला तयार होतो,” असे विराट पुढे म्हणाला.

“तेव्हा मला त्या बेकरीची कीर्ती कळली. तो माणूस आपल्या कामात इतका व्यस्त होता की, ते कोणाचे क्रेडिट कार्ड आहे याची त्याला पर्वा नव्हती. त्याने ते स्वाइप केले, मी सही केली आणि त्याला पावती दिली, त्याने त्यावर शिक्का मारला आणि त्यावर कोणाचे नाव लिहिले आहे तेही त्याने वाचले नाही. ते आश्चर्यकारक होते. मला कोणीच ओळखले नाही,” असेही विराट म्हणाला.