‘आयपीएल’च्या 14व्या हंगामाला 9 एप्रिलपासून प्रारंभ होत आहे. मुंबईत पहिला सामना 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात येईल. मात्र, या सामन्यापूर्वी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वानखेडे स्टेडियममधील 8 ग्राऊंड्समॅन करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील सामन्यांपूर्वी बीसीसीआयच्या चिंतेत वाढ झाली आहे.

वानखेडे स्टेडियमवर होणार 10 सामने

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आगामी आयपीएल हंगामाचे 10 सामने रंगणार आहेत. 10 ते 25 एप्रिल दरम्यान हे सामने आयोजित करण्यात येतील. एका वृत्तसंस्थेच्या मते वानखेडे स्टेडियममधील सर्व 19 ग्राऊंडस्टाफ सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी गेल्या आठवड्यात झाली. 26 मार्च रोजी यातील 3 लोकांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 1 एप्रिल रोजी, इतर 5 लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र राज्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील मुंबईच्या सामन्यांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘आम्हाला ‘आयपीएल’च्या सामन्यांची चिंता नाही, असे म्हटल्यास अयोग्य ठरेल. आम्ही सर्वोत्तम पद्धतीने स्पर्धेच्या आयोजनासाठी सज्ज आहोत आणि यासंदर्भातील आव्हानांचीही आम्हाला जाणीव आहे. परंतु हे आमच्या नियंत्रणात नाही. टाळेबंदीची स्थिती उद्भवली, तर त्याच्याशी सामना करण्याची आम्ही तयारी केली आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) पदाधिकाऱ्याने सांगितले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघांची सराव सत्रे सुरू आहेत. परंतु मुंबईत सराव करणाऱ्या संघांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्जने सरावाला प्रारंभ केला. हा संघ ऑबेरॉय ट्रायडंट हॉटेलमध्ये निवासास आहे आणि घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे.