Yash Dayal redemption Father recalls taunts : यश दयाल, हे तेच नाव आहे ज्याची कारकिर्द रिंकू सिंगने सलग ५ षटकार मारुन जवळपास संपुष्टात आणली होती. या षटकारानंतर केवळ वेगवान गोलंदाजालाच नव्हे, तर कुटुंबीयांनाही टीकेला सामोरे जावे लागले. पण १८ मे रोजी सीएसकेविरुद्धच्या सामन्यात दयाल आरसीबी आणि त्याच्या चाहत्यांसाठी यशस्वी ठरला. त्याने शेवटच्या षटकात धोनीची विकेट घेत १७ धावांचा बचाव करत आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. यानंतर त्याच्या कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, मागील टोमणे आठवत यशच्या वडिलांनी ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

यश दयालचे वडील काय म्हणाले?

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीदरम्यान यशच्या वडिलांनी सांगितले की, ‘सीएसकेविरुद्धच्या सामन्याच्या शेवटच्या षटकात मी टीव्ही चालू करण्यापासून स्वतःला रोखू शकलो नाही. धोनीने पहिल्या चेंडूवर षटकार मारला तेव्हा मी माझ्या मुलाचा आणखी एक सामना उध्वस्त केल्याबद्दल स्वतःला दोष देत होतो. धोनी असा फलंदाज आहे, जो आजही कोणत्याही गोलंदाजाच्या षटकात धावांचा पाऊस पाडू शकतो. त्यामुळे मी हात जोडून देवाला प्रार्थना करू करत होतो. देवा, आजचा दिवस माझ्या मुलाचा खास बनव आणि मागील हंगामाप्रमाणे होऊ देऊ नको. मात्र, पहिल्या चेंडूनंतर त्याने ज्या प्रकारे संयम राखला, त्यामुळे या विजयाचा मी मनापासून आनंद घेतला.”

लोकांचे जुने टोमणे आठवले –

आरसीबीने दयालला ५ कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर चंद्रपाल दयालने त्यांना कोणत्या टोमण्यांचा सामना करावा लागला याचा खुलासा केला. चंद्रपाल दयाल म्हणाले, “त्या सामन्यानंतर माझ्या ओळखीच्या कोणीतरी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एक मीम शेअर केला होता, ज्यामध्ये यशची खिल्ली उडवली होती. मला अजूनही आठवते की त्यांनी मीम्समध्ये लिहिले होते, ‘प्रयागराज एक्सप्रेसची कहानी सुरू होण्यापूर्वीच संपली. अशा रीतीने विनोदनिर्मिती थांबली नाही. त्यानंतर आम्ही आमचा फॅमिली ग्रुप सोडून सर्व व्हॉट्सॲप ग्रुप सोडले. इतकंच नाही तर जेव्हा आरसीबीने त्याला लिलावात ५ कोटींमध्ये निवडलं तेव्हा मला आठवतं की कोणी तरी म्हणालं होतं की, बंगळुरूने पैसा वाया घालवला. आपण अशा जगात राहतो जिथे तुम्ही सोशल मीडियावर नजर टाकली तरीही तुम्हाला अजूनही अशा गोष्टी दिसतील.”

हेही वाचा – IPL 2024 : रोहित शर्मा खोटं बोलला? स्टार स्पोर्ट्सने हिटमॅनला दिले चोख प्रत्युत्तर, काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या

आता मला खूप शुभेच्छा मिळत आहेत – चंद्रपाल दयाल

यश दयालचे वडील पुढे म्हणाले, “प्रत्येकाला यश कमजोर वाटत होता. आता माझ्यावर फोनवरुन खूप अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पण तरीही त्याच्या मेहनतीबद्दल आणि दबावाला तोंड देण्याच्या पद्धतीबद्दल कोणीही चर्चा करत नाही. गेल्या वर्षभरात यशला त्याच्या खेळात अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. अलीकडच्या काळात आपल्याला एक कुटुंब म्हणून जाणवलेली एक गोष्ट म्हणजे क्रिकेट हा खरोखरच एक मजेदार खेळ आहे.”

हेही वाचा – KKR vs SRH Qualifier 1 : कोलकाता की हैदराबाद प्लेऑफ्समध्ये कोणाचं वर्चस्व? जाणून घ्या

यश दयालचे वडील अद्याप स्टेडियममध्ये गेलेले नाहीत –

यश दयालचे वडील म्हणाले, “यंदाच्या आयपीएलमध्ये मी अद्याप स्टेडियममध्ये एकही सामना पाहिला नाही. यशने मला शेवटचे दोन लीग सामने पाहण्यासाठी बंगळुरूला येण्यास सांगितले होते. मी त्याला अचानक म्हणालो, आम्ही प्लेऑफला येऊ. तो म्हणाला, ‘पप्पा, शक्यता खूप कमी आहे. आता ते पात्र झाले आहेत आणि मी अहमदाबादसाठी माझी तिकिटे बुक करेन.”