‘गेल्या वर्षी काऊंटी क्रिकेट खेळल्यानंतर पिण्याच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली. कारण तोवर मी सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. मी रिहॅब सेंटरमध्ये दाखल झालो. २६ दिवस मी तिथे उपचार घेतले. आता मला या प्रश्नासंबंधी कसं काम करायचं आहे ते कळलं आहे. रिहॅब सेंटरमध्ये जाण्याचा निर्णय मूलगामी ठरला. माझ्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड फरक पडला. मी अधिक परिपक्व झालो. मी आता संतुलित विचार करतो. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये ३०वर्षीय असल्याप्रमाणे वाटलं. मी जिमला जात होतो, फिल्डिंग ड्रील करत होतो. सराव व्यवस्थित व्हायचा’, आकाश चोप्रा यांच्या बैठ के बोल पॉडकास्टमध्ये भारताचा आघाडीचा फिरकीपटू युझवेंद्र चहल बोलत होता. या सगळ्याची सवय कशी लागली, सुरुवात कुठून झाली असं चोप्रा यांनी विचारलं.
३६वर्षीय चहलने अलीकडेच चारदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. मात्र टी२० प्रकारात तो खेळत राहणार आहे. चहलने ७२ वनडे आणि ८० टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केल्यानंतर चहलने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत हमखास विकेट्स पटकावणाऱ्या लेगस्पिनर्समध्ये चहलचं नाव घेतलं जातं. आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्सचा विक्रम चहलच्या नावावर आहे.
‘आयपीएलमध्ये खेळायला सुरुवात केली तेव्हा मी लहान होतो. तेव्हा सामना संपल्यावर, ऑफ डे दिवशी पार्टी व्हायच्या. २०११ मध्ये मी पहिल्यांदा आयपीएल खेळलो. एबी डीव्हिलियर्सने मला सांगितलं होतं की आयुष्यात संतुलन असणं खूप महत्त्वाचं आहे. हे ऐकायला सोपं वाटतं पण प्रत्यक्षात कठीण आहे. घटस्फोटानंतर गोष्टी बिघडत गेल्या, मद्यप्राशनाचं प्रमाण प्रचंड वाढलं. माझी मानसिक अवस्थाही ठीक नव्हती. हे सगळं असंच सुरू राहिलं तर माझ्या क्रिकेटला फटका बसण्याची शक्यता होती. या खेळासाठी मी आयुष्याची उमेदीची वर्ष दिली, वेळ दिला, तीच गोष्ट नीट राहिली नसती. तो विषय मी आता बंद केला आहे. आता मी अतिशय चांगल्या मानसिक स्थितीत आहे’, असं चहलने सांगितलं.
खाजगी आयुष्याविषयी सार्वजनिक चर्चा होण्यासंदर्भात चोप्रा यांनी विचारलं. चहल म्हणाला, ‘जेव्हा तुम्ही सेलिब्रेटी होता तेव्हा तुमचं आयुष्य सार्वजनिक होऊन जातं. कोणीही तुमच्या आयुष्यावर बोलू शकतं, टीका करू शकतं. ट्रोल करू शकतं. मला खूप वाईट वाटायचं. तेव्हा परिस्थिती कठीण होती. त्याचा माझ्या क्रिकेटवरही परिणाम झाला. त्यावर्षी मी दोन वनडे सामने खेळलो. त्यानंतर टी२० सामने खेळलोच नाही कारण माझी मानसिक स्थिती नीट नव्हती. मी शंभर टक्के योगदान देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. माझ्या या अवस्थेचा त्रास तसंच फटका संघाला बसू नये असं वाटलं’.
‘मी अनिरुद्ध सरांशी बोललो. विश्रांती घेण्यासंदर्भात विनंती केली. त्यांनी परवानगी गिली. ते आधारवड होऊन उभे राहिले. किती दिवस हे ओझं बाळगणार असा विचार मी केला. माझ्या मनात दडपण असे. पॅनिक अटॅक्स येत असत. माझ्या मनात चलबिचल असे. हृदयाचे ठोके झपाट्याने वाढायचे. पॅनिक अटॅकवेळी माझा चेहरा आक्रसून जात असे. ओठ मुडपून जात. मी नीट नाही हे माझ्या बरोबरच्या लोकांना कळत असे. अँक्झायटी किती टोकाची असू शकते याचा मला अंदाज आला. सोशल मीडियावर काहीही बोललं जातं हे माझ्या लक्षात आलं. आयपीएलवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला’, असं चहलने सांगितलं.
‘हळूहळू हे सगळं कमी होत गेलं. मी सोडूनच देण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर लोक बसत बसतात. तुम्हा कोणालाही बोलण्यापासून रोखू शकत नाहीत. मी सगळं नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला. पंजाब किंग्ज संघाने माझ्यासाठी तब्बल १८ कोटी रुपये खर्च केले होते. त्यांनी माझ्यावर एवढा विश्वास ठेवला. मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ शकत नाही’.
