फिफा विश्वचषक २०२६ ला ११ जूनपासून सुरूवात होणार आहे. फिफा विश्वचषकात जगभरातील ४८ सामने खेळवले जाणार आहेत. अमेरिकामध्ये सामने होणार असून सर्व संघ त्या ठिकाणी जमले आहेत. यादरम्यान इराण-अमेरिका यांच्यातील युद्ध आणि घडलेल्या संपूर्ण घटना आपण पाहतच आहोत. यादरम्यान इराणचा संघदेखील फिफा विश्वचषक खेळणार असल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्यावर असणार आहेत. यादरम्यान आता इराणने स्पर्धेतील सामना कोणत्या कारणांमुळे थांबवू शकतो, याबाबत इशारा दिला आहे.

इराणचे क्रीडा मंत्री अहमद दोन्यामाली यांनी इशारा दिला आहे की, फिफा विश्वचषक सामन्यांदरम्यान अधिकृत मान्यता नसलेले ध्वज फडकवले गेल्यास किंवा राष्ट्रीय संघाविरुद्ध घोषणाबाजी झाल्यास इराण संघ सामना थांबवू शकतो. इराणचा संघ जी गटात (Group G) आहे. या संघाचा पहिला सामना १५ जून रोजी लॉस एंजेलिसमध्ये न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर २१ जून रोजी याच ठिकाणी इराण संघाचा सामना बेल्जियमशी होईल, तर २६ जून रोजी सिएटलमध्ये ते इजिप्तविरुद्ध खेळतील.

इराणने फिफा विश्वचषकापूर्वी काय धमकी दिली?

इराणी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्यामाली यांनी सांगितलं की, “आम्ही फिफाला (FIFA) कळवलं आहे की, विश्वचषकादरम्यान इराणचे सामने ज्या स्टेडियममध्ये होतील, तिथे जर अनधिकृत असलेले ध्वज आणले गेले किंवा राष्ट्रीय संघाविरुद्ध घोषणाबाजी केली गेली, तर सामना थांबवण्याची जबाबदारी निश्चितपणे संघ व्यवस्थापकाची असेल. इजिप्तविरुद्धच्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये कोणतीही अनुचित घटना घडणार नाही, असं आश्वासन आम्हाला देण्यात आलं आहे.”

एप्रिल महिन्यात, इराणला विश्वचषकातून वगळण्याची मागणी करण्यासाठी व्हँकुव्हरमधील फिफा (FIFA) काँग्रेसच्या बाहेर निदर्शक एकत्र आले होते. इराणचा राष्ट्रीय संघ इराणी जनतेचे नव्हे, तर ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’चे प्रतिनिधित्व करतो, असा युक्तिवाद त्यांनी केला. इराण आणि इजिप्त यांच्यातील सामनाही चर्चेत आला, कारण दोन्ही देशांच्या फुटबॉल संघटनांनी सामन्यादरम्यान LGBTQ-संबंधित उपक्रमांवर बंदी घालण्याची फिफाला विनंती केल्याचे वृत्त आहे. स्थानिक आयोजकांनी हा सामना सिएटलच्या ‘प्राइड वीकेंड’ सोहळ्यासाठी ‘प्राइड सामना’ म्हणून आयोजित केला आहे.

मैदानाबाहेर, स्पर्धेपूर्वी इराणी संघाला अनेक प्रशासकीय समस्यांचा सामना करावा लागला आहे. इराणी फुटबॉल महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, विश्वचषकापूर्वी अवघ्या काही दिवसांतच त्यांचे तिकीट वाटप रद्द करण्यात आले. परिणामी, ज्या चाहत्यांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच केले होते, त्यांना सामने पाहण्याची संधी मिळणार नाही. इराणचा संघ सध्या तिजुआना (मेक्सिको) येथे सराव करत असून, सध्याच्या राजकीय तणावामुळे त्यांना प्रवासाशी संबंधित आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इराणी संघाला त्यांच्या प्रत्येक विश्वचषक सामन्याच्या एक दिवस आधी अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल, अशी माहिती अमेरिकेच्या ‘होमलँड सिक्युरिटी’ विभागाने दिली आहे.