मेक्सिको सिटी : इराणचे विश्वचषकातील सामने अमेरिकेऐवजी मेक्सिकोमध्ये स्थानांतरित करण्यासाठी इराण जागतिक फुटबॉल संघटना ‘फिफा’सोबत वाटाघाटी करत असल्याची माहिती मेक्सिकोमधील इराण दूतावासाकडून मंगळवारी देण्यात आली.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरक्षेच्या कारणास्तव इराणच्या संघाला स्पर्धेत सहभागी न होण्याबाबत संकेत दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. अर्थात, अशा प्रकारची कोणतीही चर्चा ‘फिफा’सोबत सुरू आहे का, या वृत्ताला दुजोरा मिळालेली नाही.

इराण फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष मेहदी ताज यांनी एका निवेदनाद्वारे खेळाडू आणि अधिकार्‍यांच्या सुरक्षेसाठी इराणला आपले गट फेरीतील सामने मेक्सिकोमध्ये स्थानांतरित करायचे आहेत असे म्हटल्याचे इराणी दूतावासाने स्पष्ट केले आहे.

जेव्हा ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की ते इराणच्या राष्ट्रीय संघाच्या सुरक्षेची खात्री देऊ शकत नाहीत, तेव्हा आम्ही निश्चितपणे अमेरिकेत प्रवास करणार नाही. आम्ही सध्या ‘फिफा’सोबत इराणचे सामने मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यासाठी वाटाघाटी करत आहोत, असे या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

२०२६ चा फुटबॉल विश्वचषक अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तिन्ही देशांमध्ये संयुक्तपणे आयोजित केला जात आहे. वेळापत्रकानुसार, इराणचा सामना १६ जून रोजी न्यूझीलंडशी आणि २१ जून रोजी बेल्जियमशी कॅलिफोर्नियातील इंगलवूड येथे होणार आहे. त्यानंतर २६ जून रोजी सिएटलमध्ये इजिप्तविरुद्ध इराणचा शेवटचा साखळी सामना होणार आहे. विश्वचषक सुरू होण्यास तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना सामने अशा प्रकारे स्थानांतरित करणे ही एक अभूतपूर्व घटना ठरेल.