राजकोट  : कर्णधार जयदेव उनाडकट (११६ चेंडूंत नाबाद ७८ धावा) आणि प्रेरक मंकड (८३ चेंडूंत ७२) यांच्या झुंजार अर्धशतकांमुळे सौराष्ट्रने सोमवारी शेष भारताविरुद्ध इराणी चषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन केले. तिसऱ्या दिवशी २ बाद ४९ धावांवरून पुढे खेळणाऱ्या सौराष्ट्रची दिवसअखेर दुसऱ्या डावात ८ बाद ३६८ अशी धावसंख्या होती. त्यांच्याकडे ९२ धावांची आघाडी होती.

तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला सौराष्ट्रची ५ बाद ८७ अशी स्थिती झाली होती. चेतेश्वर पुजाराला केवळ १ धाव करता आली. त्यानंतर शेल्डन जॅक्सन (७१) आणि अर्पित वसावडा (५५) यांनी सहाव्या गडय़ासाठी ११७ धावा जोडत सौराष्ट्रचा डाव सावरला. हे दोघे काही षटकांच्या अंतराने बाद झाल्यानंतर उनाडकट आणि मंकड यांनी झुंजार फलंदाजी करत १४४ धावांची भागीदारी रचली. मंकडला जयंत यादवने माघारी पाठवले, पण उनाडकटने एक बाजू लावून धरली. दिवसअखेर तो ७८ धावांवर खेळत होता. त्याने या खेळीदरम्यान आठ चौकार आणि दोन षटकार मारले.