वासिम जाफरने केलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर इराणी करंडक सामन्याच्या पहिल्या दिवशी विदर्भाने सामन्यावर आपली पकड मजबूत ठेवलेली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या विदर्भाच्या संघाची सुरुवातही आश्वासक झाली. सलामीवीर कर्णधार फैज फजल आणि संजय रामास्वामी यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत पहिल्या सत्रामध्येच शेष भारताला बॅकफूटलला ढकललं.

फजल आणि संजय रामास्वामीने पहिल्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी केली. कर्णधार फजलने ८९ तर संजय रामास्वामीने ५३ धावांची खेळी केली. यादरम्यान वासिम जाफरने आपला सर्व अनुभव पणाला लावत विदर्भाच्या संघासाठी धावांचा ओघ कायम ठेवला. संजय रामास्वामी माघारी परतल्यानंतर वासिम जाफरने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार फैज फजलसोबत पुन्हा एकदा शतकी भागीदारी केली. फैज फजल माघारी परतल्यानंतर वासिम जाफरने एका बाजूला किल्ला लढवत ठेवत गणेश सतीशच्या साथीने अर्धशतकी भागीदारी केली. यादरम्यान वासिम जाफरने आपलं शतकही साजरं केलं.

फलंदाजांनी केलेल्या आश्वासक कामगिरीच्या जोरावर विदर्भाने पहिल्या दिवसाच्या अखेरीस २ गडी गमावत २८९ धावांपर्यंत मजल मारली आहे. शेष भारताने आपल्या संघात जयंत यादव, रविचंद्रन आश्विन आणि शाहबाज नदीम यांना जागा दिली. मात्र आश्विन आणि जयंत यादवचा अपवाद वगळता शेष भारताचे सर्व गोलंदाज आज अयशस्वी ठरले. त्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या खेळात विदर्भाच्या संघाला बाद करण्यात शेष भारताला यश येतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.