Ireland Beat Oman in T20 WC 2026: आयर्लंड आणि ओमान यांच्यात टी-२० विश्वचषकातील सामना खेळवला जात आहे. या सामन्यात आयर्लंडने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. आयर्लंडने ओमानचा ९६ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात आयर्लंडचा कर्णधार लॉर्कन टकरने ऐतिहासिक खेळी करत संघाच्या विजयाचा हिरो ठरला. तर डॉकरेलच्या अखेरच्या षटकातील फटकेहबाजीसह संघाने यंदाच्या विश्चषकातील मोठी धावसंख्या उभारली.
टी-२० विश्वचषक इतिहासात आयर्लंडने त्यांचा सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. ओमानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने तब्बल २३५ धावांचा डोंगर उभारला. २३५ ही धावसंख्या यंदाच्या टी-२० विश्वचषकातील आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या आहे. तर टी-२० वर्ल्डकप इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. प्रत्युत्तरात ओमानचा संघ फक्त १३९ धावांवर सर्वबाद झाला.
आयर्लंडने दिलेल्या २३६ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ओमानची सुरूवात खराब झाली. कर्णधार पुन्हा एकदा फेल ठरला आणि ७ धावांवर बाद झाला. सलामीवीर आमिर कलीमने २९ चेंडूत ५ चौकार व २ षटकारांसह अर्धशतक केलं. तर हामिद मिर्झाने ४६ धावांची खेळी केली. याशिवाय ओमानचा एकही फलंदाज १० धावांचा आकडा पार करू शकला नाही. परिणामी संघ १८ षटकांत १३९ धावांवर सर्वबाद झाला.
आयर्लंडकडून जोशुआ लिटिलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मॅथ्यू हॅम्परेस, बेरी मॅकार्थी यांनी प्रत्येकी २ विकेट्स तर डॉकरेलने १ विकेट घेतली.
प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडची सुरूवात खराब झाली. पहिले ३ फलंदाज १५ धावाही न करता बाद झाले. यानंतर आलेल्या लॉर्कन टकरने एका टोकाकडून संघाचा डाव सावरला. टकरने ग्रेथ डिलानी सह ५६ चेंडूत १०१ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. डिलानी ३० चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ५६ धावा करत बाद झाला. यानंतर आलेल्या जॉर्ज डॉकरेलसह टकरने हाहाकार केला. दोघांनी मिळून १९ चेंडूत तब्बल ७० धावांची भागीदारी रचली. यादरम्यान डॉकरेलने ९ चेंडूत ५ षटकारांसह ३५ धावा कुटल्या.
तर कर्णधार लॉर्कन टकर ५१ चेंडूत १० चौकार व ४ षटकारांसह ९४ धावांची खेळी करत नाबाद परतला. टकरच शतक हुकलं असलं तरी त्याने आयर्लंडसाठी इतिहास घडवत टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वात मोठी खेळी. केली.

