Ireland all rounder cricketer Simi Singh liver transplant surgery : आयर्लंड क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू सिमरनजीत सिंग उर्फ ​​सिमी सिंग याच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतेच तो यकृत निकामी झाल्याने त्रस्त असल्याचे उघड झाले होते. त्याला मेदांता, गुरुग्रामच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते आणि तो यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत होता. आता सिमी सिंगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना एक मोठी अपडेट दिसी आहे. ज्यामध्ये त्याने सांगितले की पत्नीमुळेच त्याचा जीव वाचला आहे, कारण यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे.

अष्टपैलू खेळाडू सिमी सिंगने आपल्या प्रकृतीबाबत अपडेट देताना सांगितले की, त्याची यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. तो आता बरा होण्याच्या मार्गावर आहे. काही महिन्यांपूर्वी आयर्लंडमध्ये सिमी सिंगला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे तो जूनमध्ये उपचारासाठी भारतात आला होता. आता त्याची पत्नी आगमदीपने त्याला यकृत दान केले आहे.

सिमी सिंग इन्स्टा स्टोरी

सिमी सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करताना लिहिले, ‘हाय फ्रेंड्स. एक अपडेट आहे, माझी यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही १२ तासांची शस्त्रक्रिया होती आणि आता मी बरा होण्याच्या प्रक्रियेत आहे. चुकीची अँटिबायोटिक्स आणि स्टिरॉइड्स दिले गेले होते, ज्यामुळे माझे यकृत निकामी झाले होते. मी खूप भाग्यवान आहे की माझ्या पत्नीनेच माझ्यासाठी दाता बनून मदत केली. माझ्यासाठी संदेश आणि प्रार्थना करणाऱ्या मी प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो.’

हेही वाचा – Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर

कोण आहे सिमी सिंग?

सिमी सिंग हा भारतीय वंशाचा खेळाडू आहे. पंजाबमध्ये जन्मलेल्या सिमी सिंगचे शालेय शिक्षण भारतात झाले. एवढेच नाही तर तो पंजाबकडून अंडर-१५ आणि अंडर-१७ संघात खेळला आहे. तो विराट कोहली, युजवेंद्र चहल आणि सिद्धार्थ कौल या खेळाडूंसोबत खेळला आहे. सिमी सिंगची गणना आयर्लंडच्या सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये केली जाते.

हेही वाचा – WTC Final 2025 : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला किती सामने जिंकावे लागतील? जाणून घ्या समीकरण

टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये घेतला होता भाग –

३७ वर्षीय सिमी सिंगने आतापर्यंत आयर्लंडकडून ३५ एकदिवसीय आणि ५३ टी-२० सामने खेळले आहेत. या काळात त्याने एकदिवसीय सामन्यात ३९ आणि टी-२० मध्ये ४४ विकेट्सल घेतल्या आहेत. याशिवाय त्याने वनडेमध्ये एका शतकाच्या मदतीने ५९३ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर टी-२० मध्ये २९६ धावा केल्या आहेत. २०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये खेळताना दिसला होता.