Ireland Wins T20I Series Against India for the first time: आयर्लंड संघाने इतिहास घडवत भारताला टी-२० मालिका पराभवाचा धक्का दिला आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात आयर्लंड संघासमोर भारताचा संघ १५५ धावाही करण्यात अपयशी ठरला आणि आयर्लंडने अवघ्या १ धावेने सामना जिंकला. संपूर्ण ताकदीनिशी उतरलेला टी-२० वर्ल्ड चॅम्पियन संघ जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या आयर्लंड संघाविरूद्ध पराभूत झाली आहे. टीम इंडियाचे फलंदाज दोन्ही सामन्यांमध्ये चांगलेच अपयशी ठरले आहेत. यासह भारताने नव्या कर्णधाराच्या नेतृत्त्वात आयर्लंडसारख्या संघाविरूद्ध टी-२० मालिका गमावली आहे.
भारताने दुसऱ्या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यातही प्रथम गोलंदाजी करत सामना गमावल्यानंतरही भारताने दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर प्रथम फलंदाजी करत आयर्लंडने १५४ धावा केल्या. तर संपूर्ण ताकदीनिशी उतरलेला भारतीय संघ प्रत्युत्तरात १५५ धावा करू शकला नाही. यासह २०२३ नंतर भारताने पहिल्यांदा टी-२० मालिका गमावली आहे.
अखेरच्या षटकात भारताला विजयासाठी २० धावांची गरज होती. पहिल्या चेंडू वाईड त्यानंतर पहिल्या दोन लीगल चेंडूंवर ३ धावा केल्यानंतर हर्षित राणाने चौकार लगावला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली आणि चौथा चेंडू पुन्हा वाईड टाकला, चौथ्या लीगल चेंडूवर अर्शदीपने एक धाव घेत हर्षित राणाला स्ट्राईक दिली. हर्षित राणा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात हॅरी टेक्टरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. अखेरच्या चेंडूवर प्रिन्स यादवने येऊन षटकार लगावला, पण आयर्लंडने एका धावेने सामना जिंकला.
आयर्लंडने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खूपच खराब झाली. जय मुंद्राने पहिल्याच षटकात संजू सॅमसन व अभिषेक शर्मा यांना गोल्डन डकवर बाद केलं. यानंतर श्रेयस अय्यरला जय मुंद्राने १० धावांवर क्लीन बोल्ड केलं. तर इशान किशन धाव घेण्याच्या प्रयत्नात १२ धावांवर धावबाद झाला. तिलक वर्माने भारताचा डाव सावरत ५५ धावा करत अर्धशतक झळकावलं. पण भारताने ठराविक अंतराने गमावलेल्या विकेट्समुळे आयर्लंड सामन्यात कायम राहिला. अक्षर पटेल १४ धावा, तर शिवम दुबे २० धावा आणि हर्षित पटेलने अखेरच्या षटकात २१ धावा करत संघाच्या विजयाची शक्यता कायम ठेवली होती, पण तोही मोठा फटका खेळताना झेलबाद झाला.
भारताच्या फलंदाजांची या टी-२० मालिकेत बोलती बंद करण्यात भारतीय वंशाचा असलेल्या राज मुंद्रा याने मोठी भूमिका बजावली. त्याने या मालिकेत ६ विकेट्स घेतल्या आणि संघाच्या मालिका विजयाचा हिरो ठरला.
प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. पण हॅरी टॅक्टरने ५३ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्यानंतर लॉर्कन टकरने १५ धावांची खेळी केली. तर बेंजामिन कॅलिट्जने ३७ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तर डॉकरेलने १९ धावा केल्या आणि संघाला १५४ धावा करून दिल्या.
