India vs Ireland 1st T2OI Highlights: भारतीय संघाने काही दिवसांपूर्वी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली होती. वर्ल्डकपनंतर भारतीय संघ पहिल्याच सामन्यात आयर्लंडचा सामना करण्यासाठीा मैदानात उतरला. पण पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला आयसीसी रँकिंगमध्ये १२ व्या क्रमांकावर असलेल्या आयर्लंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा आयर्लंडसाठी ऐतिहासिक विजय आहे. कारण याआधी आयर्लंडचा संघ भारतीय संघाला टी-२० क्रिकेटमध्ये पराभूत करु शकला नव्हता. भारतीय संघ १८३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण भारताचा डाव १४८ धावांवर आटोपला. यासह आयर्लंडने हा सामना ३४ धावांनी आपल्या नावावर केला.

भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावांचा डोंगर सर करायचा होता. भारताची मजबूत बॅटिंग लाईनअप पाहता हे आव्हान फार मोठं नव्हतं. पण आयर्लंडसाठी पहिलाच सामना खेळत असलेल्या गोलंदाजांनी भारतीय संघाला एकापाठोपाठ एक मोठे धक्के दिले. भारताने पहिल्याच षटकात १६ धावा वसूल केल्या. पण त्यानंतर पुढच्याच षटकात पहिला सामना खेळत असलेल्या जय मुंद्राने पहिल्या चेंडूवर संजू सॅमसनला बाद करत माघारी धाडलं. संजू अवघ्या ५ धावांवर माघारी परतला. त्यानंतर इशान किशन १ आणि कर्णधार श्रेयस अय्यर अवघ्या ३ धावांवर माघारी परतला. दोघांना मॅथ्यू हॉलार्डने बाद केलं. त्यानंतर उपकर्णधार तिलक वर्मा अवघ्या १९ आणि वॉशिंग्टन सुंदर ९ धावांवर माघारी परतला. शेवटी अक्षर पटेल आणि शिवम दुबेने जोर लावला, पण दुबे २५ आणि अक्षर पटेल अवघ्या १५ धावांवर माघारी परतला.

पदार्पणात गोलंदाजांनी मैदान गाजवलं

या सामन्यात जय मुंद्रा आणि मॅथ्यू हॉलार्ड या दोघांना पदार्पण करण्याची संधी मिळाली. दोघांनी आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट्स घेऊन भारतीय संघाला मोठे धक्के दिले. मॅथ्यू हॉलार्डने ४ षटकात अवघ्या २८ धावा खर्च केल्या आणि ३ गडी बाद केले. तर जय मुंद्राने आपल्या स्पेलमध्ये ४ षटकात अवघ्या २६ धावा खर्च केल्या आणि २ गडी बाद केले.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडने २० षटकांअखेर १८२ धावांचा डोंगर उभारला. सलामीला आलेल्या टिम टेक्टरने १७, तर रॉस अडायरने १२ धावांची खेळी केली. तर हॅरी टेक्टर शून्यावर बाद झाला. पण कर्णधार लॉर्कन टकरने दमदार फलंदाजी करत ३६ चेंडूंमध्ये ५० धावांची खेळी केली.त्याला गॅरेथ डेलानीची चांगलीच साथ लाभली. गॅरेथने ४९ धावांची खेळी केली. तर शेवटी जॉर्ज डॉकरेलने १९ धावांची खेळी करुन संघाची धावसंख्या ९ गडी बाद १८२ धावांवर पोहोचवली.