Irfan Pathan Advice To Suryakumar Yadav: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने २००७ नंतर २०२४ मध्ये झालेल्या टी – २० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. आता भारतीय संघाकडे तिसऱ्यांदा जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची संधी असणार आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडला आजवर एकदाही जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच जेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने मोलाचा सल्ला दिला आहे.
अंतिम सामन्यासाठी इरफान पठाणने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवला मोलाचा सल्ला दिला आहे. इरफान पठाणच्या मते, न्यूझीलंडच्या सलामी जोडीचा विकेट हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहने लवकर गोलंदाजीला यावं. आतापर्यंत अर्शदीप सिंग गोलंदाजी आक्रमणाची सुरुवात करत आहे. तर बुमराह पावरप्लेमध्ये एकच षटक टाकत आहे. इरफान पठाणच्या मते, जसप्रीत बुमराहने पहिले किंवा दुसरे षटक टाकायला हवे.
अंतिम सामन्यात जसप्रीत बुमराहचे ४ षटक भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहे. इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने २५४ धावांचे आव्हान ठेवले होते. पण इंग्लंडच्या फलंदाजांनी हा सामना खेचून आणला होता. पण १६ व्या आणि १८ व्या षटकात गोलंदाजी बुमराहने सामना फिरवला होता. त्याने १६ व्या षटकात गोलंदाजी करताना ८ धावा खर्च केल्या होत्या. तर १८ व्या षटकात गोलंदाजी करताना त्याने अवघ्या ६ धावा खर्च केल्या होत्या.
इंग्लंडच्या फलंदाजांनी इतर गोलंदाजांचा सामना करताना चांगलाच हल्लाबोल केला होता. जर बुमराहने ते २ निर्णायक षटक टाकले नसते, तर सामना निसटला असता. २५४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने हा सामना अवघ्या ७ धावांनी गमावला. जसप्रीत बुमराहने आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांमध्ये ६.६३ च्या इकोनॉमिने १० गडी बाद केले आहेत.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेईंग ११: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती/ कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग
