Irfan Pathan On Srafaraz Khan: भारतीय संघातील स्टार फलंदाज सर्फराज खानला दक्षिण आफ्रिका अ संघाविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय अ संघात स्थान देण्यात आलेलं नाही. निवड समितीने घेतलेल्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंनी सर्फराज खानला संघाबाहेर ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर केवळ सर्फराज खानची जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणाला राजकीय आणि धार्मिक वळण लागलं आहे. काहींच्या मते, सर्फराज ‘खान’ असल्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान दिलं गेलेलं नाही. दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सर्फराज खान २०२४ मध्ये न्यूझीलंडविरूद्ध शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. भारतीय संघासाठी खेळायची संधी मिळाली, तेव्हाही त्याने धावांचा पाऊस पाडला. सर्फराजला फिटनेसमुळे ट्रोल केलं जात होतं. पण त्याने आपल्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आणि वजन कमी केलं. दुखापतीमुळे त्याला दुलीप ट्रॉफी आणि वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी स्थान दिलं गेलं नव्हतं. वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा झाल्यानंतर त्याला फिट घोषित करण्यात आलं होतं. रणजी ट्रॉफीतील पहिल्याच लढतीत त्याने ७४ धावांची खेळी करून आपला फॉर्म आणि फिटनेस सिद्ध केला. तरीदेखील त्याला भारतीय अ संघात स्थान दिलं गेलेलं नाही.

अनेकांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकरांवर जोरदार टीका केली आहे. दोघांनी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली जात आहे. गंभीर आणि आगरकर अडचणीत असताना इरफान पठाण मदतीसाठी धावून आला आहे. इरफान पठाणने एक्सवर पोस्ट शेअर करत,असे कुठलेही ‘नरेटिव्ह’ बनवू नका, जे सत्याच्या जवळ देखील नसेल, असे म्हटले आहे.

इरफान पठाण काय म्हणाला?

इरफान पठाणने आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत लिहिले की, “निवडकर्ते आणि प्रशिक्षक यांची नेहमीच काहीतरी योजना असते. कधीकधी हे चाहत्यांना चुकीचे दिसू शकते, पण कृपया गोष्टींना तोडू-मोडू नका किंवा असे नरेटिव्ह तयार करू नका जे सत्याच्या जवळपास देखील नसेल.”