Chennai Super Kings Playing 11: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. स्पर्धेतील पहिला सामना २८ मार्चला खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध होणार आहे. या सामन्याआधी भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने चेन्नई सुपर किंग्ज संघाची मजबूत प्लेईंग ११ निवडली आहे. मुख्य बाब म्हणजे, त्याने एमएस धोनीला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलेलं नाही.

इरफान पठाणने निवडलेल्या प्लेईंग ११ मध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून युवा फलंदाज आयुष म्हात्रे आणि पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व करत असलेला संजू सॅमसनची निवड केली आहे. संजू सॅमसनने काही दिवसांपूर्वीच झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. या स्पर्धेतील शेवटच्या ३ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ८० हून अधिकची खेळी केली होती. या स्पर्धेत त्याने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. तर आयुष म्हात्रे देखील आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.

तर संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला त्याने तिसऱ्या क्रमांकावर ठेवलं आहे. ऋतुराज गायकवाडवर यावेळी मोठी जबाबदारी असणार आहे. तर शिवम दुबे आणि डेवाल्ड ब्रेव्हिस या फलंदाजांवर मोठे फटके खेळण्याची जबाबदारी असणार आहे. तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्याने सर्फराज खानची निवड केली आहे. इरफान पठाणच्या मते, सर्फराज खानला स्थान मिळायला हवं. पण जर धोनी खेळणार असेल, तर त्याला स्थान मिळणं कठीण आहे. तर सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी त्याने कार्तिक शर्मा आणि आठव्या क्रमांकासाठी प्रशांतवीरची निवड केली आहे.

तसेच वेगवान गोलंदाज म्हणून त्याने नॅथन एलिसची निवड केली आहे. पण नॅथन एलिस स्पर्धेबाहेर झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्याच्या जागी अकील होसेनेला संधी दिली जाऊ शकते. तर १० व्या क्रमांकावर मॅट हॅनरी आणि ११ व्या क्रमांकावर नूर अहमदला संधी दिली आहे. तर १२ वा खेळाडू म्हणून त्याने भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदला स्थान दिलं आहे.