आयपीएलच्या महासंग्रामासाठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात भाव न मिळालेल्या इरफान पठाणची अखेर आयपीएलच्या संघात निवड झाली आहे. आयपीएलच्या १० व्या सत्रात इरफान पठाण गुजरात लायन्सकडून मैदानात उतरणार आहे. ईशांत शर्मासह इरफानवर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. आयपीएलच्या लिलावात इरफान पठाण ५० लाखाच्या मूळ किंमतीवर ‘अनसोल्ड’ राहिला होता. मात्र, गुजरात लायन्स संघाचा ड्वेन ब्रावोला झालेल्या दुखापतीनंतर इरफानची आयपीएलच्या संघात वर्णी लागली आहे. आता त्याला अकरामध्ये स्थान मिळणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

३२ वर्षीय इरफान पठाण आयपीएलमध्ये आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली डेअर डेव्हिल्स, किग्ज इलेव्हन पंजाब, हैदराबाद आणि पुणे सुपरजाएट्ंस या संघातून मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. वेगवेगळ्या पाच संघातून १०२ सामन्यामध्ये खेळताना इरफानने ८० बळी मिळविले असून, ११३७ धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे गुजरातच्या संघामध्ये स्थान मिळविल्यानंतर मैदानात तो कशी कामगिरी करेल, याकडे त्याच्या चाहत्यांसह क्रिकेट रसिंकामध्ये उत्सुकता असेल.

आयपीएलमध्ये गुजरात लायन्स संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्यांना केवळ २ सामन्यामध्ये विजय मिळविता आला आहे. त्यामुळे उरलेल्या सामने जिंकून गुजरात लायन्स आयपील स्पर्धेतील आव्हान टिकविण्यासाठी प्रयत्नशील असेल. गुजरातच्या या प्रयत्नांना इरफान कशा प्रकारे हातभार लावणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. सध्याच्या घडीला गुजरातचा संघ गुणतालिकेमध्ये सातव्या क्रमांकावर आहे.