India vs England 5th T20I: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता, त्यानंतर पुढील चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघातील फलंदाजांचा सुपर फ्लॉप शो पाहायला मिळाला. मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघ २५८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला २०१ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान या सामन्यानंतर इशान किशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
इशान किशन गेले काही महिने भारतीय टी-२० संघातून बाहेर होता. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करून त्याने भारतीय टी-२० संघात स्थान मिळवलं. त्यानंतर त्याची टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. या स्पर्धेत त्याने दमदार फलंदाजी केली होती. त्यानंतर आयपीएल स्पर्धेतही त्याच्या फेलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला. या कामगिरीच्या बळावर त्याने आयसीसी टी-२० फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी कब्जा केला आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.
इशान किशनचा व्हिडिओ होतोय व्हायरल
दरम्यान इशान किशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यात तो सामन्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट चाहत्याची भेट घेताना दिसून येत आहे. त्यानंतर तो क्रिकेट चाहत्याला ऑटोग्राफ देखील देताना दिसून येत आहे. दरम्यान मैदानावर खेळताना पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणं टाळणं आणि सामना झाल्यानंतर पाकिस्तानच्या चाहत्याची भेट घेणं हे बरोबर आहे की चुकीचं, अशा प्रतिक्रिया हा व्हिडिओ व्हायरल होताच येऊ लागल्या आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारताचा पराभव
या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक १३१ आणि कर्णधार हॅरी ब्रुकने नाबाद ९५ धावांची खेळी केली. दोघांनी मिळून २३३ धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर इंग्लंडने ३ गडी बाद २५७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून इशान किशनने ५६ धावांची खेळी केली. तर तिलक वर्माने ५३ धावांची खेळी केली. भारतीय संघाला ८ गडी बाद २०१ धावा करता आल्या.
