Ishan Kishan Hundred IND vs NZ 5th t20: इशान किशनने भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात वादळी शतक झळकावलं. आहे. इशान किशनचं हे टी-२० मधील पहिलं शतक आहे. इशानने ९१ धावांवर असताना सलग दोन षटकार लगावत दणक्यात आपलं शतक पूर्ण केलं. यासह भारताची धावसंख्या २०० पलीकडे गेली आहे. गेल्या सामन्यात दुखापतीमुळे बाहेर झाल्यानंतर, त्याने या सामन्यात पुनरागमन केलं आणि स्फोटक खेळी करत किवी गोलंदाजांची धुलाई केली.

इशान किशनने अवघ्या ४२ चेंडूत ६ चौकार १० षटकारांच्या मदतीने त्याने शतक केलं आहे. इशानने शतक झळकावताच हेल्मेट काढत आक्रमक सेलिब्रेशन केलं. इशानचं शतक पूर्ण झालेलं पाहता हार्दिक जणू स्वत:चं शतक झाल्याप्रमाणे आनंदाने उड्या मारत त्याच्याजवळ पोहोचला आणि त्याला घट्ट मिठी मारली. हार्दिक पंड्याच्या या सेलिब्रेशनने सर्वांचं लक्ष वेधलं, याचा व्हीडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे.

इशान किशनने या सामन्यात वादळी फलंदाजी करत केवळ २८ चेंडूत त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने डावाच्या १२ व्या षटकात न्यूझीलंडचा फिरकी गोलंदाज ईश सोधीची धुलाई केली. अर्धशतकी खेळी केल्यानंतर पुढच्या षटकात त्याने २९ धावा कुटल्या. षटकाची सुरुवात वाईडने झाली, त्यानंतर इशानने सलग तीन चौकार मारले. त्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर एक षटकार, पाचव्या चेंडूवर आणखी एक चौकार आणि नंतर शेवटच्या चेंडूवर षटकार मारून उत्कृष्ट फटकेबाजी केली.

इशान किशन संजू सॅमसन ६ धावांवर बाद झाल्यानंतर फलंदाजीला उतरला. यानंतर इशान व अभिषेक यांनी १७ धावांची भागीदारी केली. यानंतर अभिषेक शर्मा ३० धावांवर क्लीन बोल्ड होत माघारी परतला. या विकेटनंतर सूर्यकुमार यादव इशान किशन यांनी संघाचा डाव उचलून धरला. इशान किशनने एका टोकाकडून चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. तिसऱ्या विकेटसाठी सूर्या व इशान किशन यांनी ५७ चेंडूत १३७ धावांची भागीदारी रचली.

इशान किशन शतकानंतर पुढच्या षटकामध्ये मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. इशान किशनने या सामन्यात ४३ चेंडूत ६ चौकार व १० षटकारांच्या मदतीने १०३ धावांची खेळी करत बाद झाला. इशान किशन बाद झाल्यानंतर हार्दिकने चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. हार्दिकने १७ चेंडूत १ चौकार व ४ षटकारांच्या बळावर ४२ धावा केल्या. यासह टीम इंडियाने २० षटकांत ५ बाद २७१ धावांचा डोंगर उभारला.