Ishan Kishan Record In India vs Pakistan Match: भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत एकतर्फी सामना पाहायला मिळाला. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना करताना ७ गडी बाद १७५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संपूर्ण डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. संपूर्ण संघाला मिळून अवघ्या ११४ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान भारतीय संघाकडून ७७ धावांची खेळी करणारा इशान किशन या सामन्याचा हिरो ठरला. यासह इशानच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
इशान किशन सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. आतापर्यंत त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे, त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा शून्यावर माघारी परतला. त्यामुळे इशान किशनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि ७७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याची समानीवर म्हणून निवड करण्यात आली. यासह टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून सलामीवीर पुरस्कार पटकावणारा तो पाहिलाच भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे.
इशान किशनने सामनावीर पुरस्कार पटकावताच तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, इरफान पठाण आणि युवराज सिंग सारख्या दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली आहे. या सर्व खेळाडूंच्या नावे टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळताना प्रत्येकी १-१ सामनावीर पुरस्कार पटकावण्याची नोंद आहे.
भारतीय संघाचा विजय
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना इशान किशनने ७७ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ३२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटकअखेर १७६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानकडून उस्मान खानने ४४ धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानचा डाव ११४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना ६१ धावांनी आपल्या नावावर केला.

