Ishan Kishan Broke Abhishek Sharma Record: ईशान किशनने टीम इंडियात निवड झाल्यानंतर वादळी खेळीच्या बळावर दणक्यात पुनरागमन केलं आहे. ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या टी-२० सामन्यात संघाला विजयापर्यंत नेलं. सामनावीर ठरलेल्या ईशान किशनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरत उत्कृष्ट फटकेबाजीचा नमुना सादर केला. ईशान किशनने यादरम्यान न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई करत अभिषेक शर्माला मागे टाकत त्याचा विक्रम आपल्या नावे केला.

इशान किशनने फक्त ३२ चेंडूत ७६ धावा केल्या. मालिकेतील पहिल्या सामन्यात किशनने काही चांगले फटके खेळले पण तो लवकर बाद झाल्याने आपल्या खेळीची छाप पाडू शकला नाही. पण दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने त्याच्या फटकेबाजीने त्याची संघातील निवड अगदी योग्य असल्याचं सिद्ध केलं. या खेळीसह इशान किशनने अभिषेक शर्माचा विक्रम मोडला, जो त्याने पहिल्याच टी-२० सामन्यात केला होता.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही, दोन्ही सलामीवीर डावाच्या सुरुवातीच्या सात चेंडूंतच पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर इशान किशनने कर्णधार सूर्यकुमार यादवसह आघाडी घेत एका टोकापासून जलद धावा काढण्याची जबाबदारी घेतली. या सामन्यात इशानने फक्त २१ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह तो न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात कमी चेंडूत अर्धशतक करणारा भारताचा खेळाडू बनला.

टीम इंडियाचा आक्रमक फलंदाजी सलामीवीर अभिषेक शर्माच्या नावावर यापूर्वी हा विक्रम होता, ज्याने या मालिकेतील पहिल्या सामन्यात २२ चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. यानंतर ईशानने आता अवघ्या ४८ तासांत अभिषेकचा विक्रम मागे टाकून एक नवा इतिहास घडवला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात इशान किशनने डावाच्या पहिल्या ६ षटकांतच आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह, पूर्ण सदस्य संघांमध्ये पॉवरप्लेमध्ये अर्धशतक पूर्ण करणारा इशान किशन हा भारताचा पहिला नॉन-ओपनर फलंदाज ठरला. तर जागतिक क्रिकेटमधील पूर्ण सदस्य संघांमध्ये तो या यादीतील तिसरा खेळाडू आहे.

पॉवर प्लेमध्ये भारतीय फलंदाज म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत इशान किशन फक्त अभिषेक शर्माला मागे टाकण्यात अपयशी ठरला. इशान किशनने पहिल्या ६ षटकांत २३ चेंडूत ५६ धावा केल्या होत्या, तर अभिषेक शर्माने २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात २१ चेंडूत ५८ धावा केल्या होत्या.