Ishan Kishan Creates History with Fastest Fifty: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक सामन्यात इशान किशनने वादळी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत वादळी फटकेबाजी केली. यासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावे केला आहे. तर विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये अशी वादळी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

पाकिस्तानविरुद्ध इशान किशनच्या प्रभावी फलंदाजी कामगिरीमुळे टीम इंडियाने आवश्यक धावसंख्या उभारली आहे. त्याने केवळ २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. अभिषेक शर्मा पुन्हा एकदा विश्वचषकात डकवर बाद झाला. यानंतर इशान किशनने संघाचा डाव सावरला. त्याच्या वादळी फटकेबाजीपुढे पाकिस्तानचे गोलंदाज निष्प्रभ ठरले.

इशान किशन पाकिस्तानविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळण्यासाठी उतरला होता आणि पहिल्याच सामन्यात त्याने वादळी अर्धशतक झळकावलं. पाकिस्तानविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये त्याने ४२ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय पॉवरप्लेमध्ये पहिल्यांदाच एखाद्या भारतीय फलंदाजाने इतक्या धावा केल्या आहेत. याशिवाय इशान किशनने या सामन्यात फक्त २७ चेंडूत अर्धशतक झळकावलं. यासह भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषकातील सामन्यात तो सर्वात जलद अर्धशतक करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

भारत-पाकिस्तान टी-२० वर्ल्डकप सामन्यांमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज

इशान किशन – २७ चेंडू, २०२६
इफ्तिखार अहमद – ३२ चेंडू, २०२२
मिस्बाह उल हक – ३३ चेंडू, २००७
विराट कोहली – ३४ चेंडू, २०१६
गौतम गंभीर – ३८ चेंडू, २००७

इशान किशनने या सामन्यात ४० चेंडूत १० चौकार व ३ षटकारांसह ७७ धावांची वादळी खेळी केली. इशानच्या या खेळीने भारतीय संघाच्या धावसंख्येचा पाया रचला. इशाननंतर सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा यांनी भागीदारी रचली. पण मोठे फटके खेळणं, या खेळपट्टीवर सोपं नव्हतं. तर शिवम दुबेने अखेरच्या षटकांमध्ये २७ धावांची शानदार खेळी केली. यामुळे टीम इंडियाने २० षटकांत ७ बाद १७५ धावा केल्या आहेत.

टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावणारा इशान किशन हा तिसराच खेळाडू आहे. २००७ मध्ये रॉबिन उथप्पाने हा पराक्रम केला होता. २००७ मध्ये गौतम गंभीरनेही पाकिस्तानविरुद्ध टी-२० अर्धशतक झळकावले होते. २०१२, २०१६, २०२१ आणि २०२२ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध अर्धशतकं झळकावली होती. आता, इशान किशनने ही कामगिरी केली आहे.