Ishan Kishan Fifty IND vs NAM T20 WC: टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये १२ फेब्रुवारीला आज भारत आणि नामिबिया यांच्यात खेळवला जात आहे. हा सामना दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये होत आहे. या सामन्याची नाणेफेक नामिबियाने जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताने सुरूवात दणक्यात केली आणि अवघ्या ६ षटकांत १ बाद ८६ धावा उभारल्या. यादरम्यान इशान किशनने वादळी खेळी करत इतिहास घडवला आहे.

नामिबियाविरूद्ध सामन्यात भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल केले आहेत. अभिषेक शर्मा ७ फेब्रुवारीपासूनच आजारी आहे. त्याला वायरल ताप होता आणि त्यानंतर आता त्याच्या पोटात ठिक नसल्यामुळे तो सामन्याबाहेर झाला आहे. अभिषेक कदाचित एक-दोन सामन्यांना मुकणार असल्याचं कर्णधार सूर्यकुमारने नाणेफेकीदरम्यान सांगितलं. त्याच्या जागी संजू सॅमसन टी-२० विश्वचषक सामना खेळण्याची संधी मिळाली.

संजू सॅमसन व इशान किशनच्या जोडीने संघाला वादळी सुुूरूवात करून दिली. सॅमसनने पहिल्याच षटकात षटकार लगावत सामन्याला सुरूवात केली. यानंतर सॅमसन ८ चेंडूत ३ षटकार व एक चौकार लगावत २२ धावा करत सोपा झेल देत झेलबाद झाला. यानंतर इशान किशनने वादळी फटकेबाजी केली.

इशान किशनची वादळी फलंदाजी अन् झळकावलं ऐतिहासिक अर्धशतक

इशान किशनने स्मिटच्या षटकात सलग ४ षटकार लगावले व अखेरच्या चेंडूवर एक चौकार लगावत तब्बल २८ धावा कुटल्या. यासह पॉवरप्लेमध्ये भारताने १ बाद ८६ धावा केल्या. इशानने अवघ्या २० चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं. यासह टी-२० वर्ल्डकप इतिहासात अर्धशतक झळकावणारा इशान किशन हा भारताचा पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज ठरला. याआधी कोणताही यष्टीरक्षक फलंदाज अशी कामगिरी करू शकलेला नाही.

इशान किशनने टी-२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेमध्ये आतापर्यंत दोन वेळा अर्धशतक झळकावली आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर अभिषेक शर्मा आहे, ज्याने ३ वेळा टी-२० पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळेस अर्धशतक केलं आहे. याशिवाय टी-२० वर्ल्डकप इतिहासात पॉवरप्लेमध्ये अर्धशतक करणारा इशान किशन भारताचा एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. इशान किशन नामिबियाविरूद्ध सामन्यात २४ चेंडूत ६ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावा करत झेलबाद झाला. त्याच्या या फटकेबाजीसह टीम इंडियाने १० षटकांतच १०० धावांचा पल्ला पार केला.

भारतासाठी टी२० मध्ये १-६ षटकांत ५० धावा पूर्ण करणारे फलंदाज

अभिषेक शर्मा (तीन वेळा)
रोहित शर्मा (दोनदा)
इशान किशन (दोनदा)
केएल राहुल (एकदा)
यशस्वी जयस्वाल (एकदा)